हँकॉक पुलाच्या पाडकामाचा परिणाम टेलिफोनवर; साडेतीन हजार जोडण्या बाधित
मध्य रेल्वेवरील डीसी-एसी परिवर्तनानंतर रेल्वेच्या वाहतुकीत अडथळा ठरणारा हँकॉक पूल आता रविवारी पाडण्यात येणार असला, तरी या कामामुळे दक्षिण मुंबईतील ‘महानगर टेलिफोन निगम लिमिटेड’च्या (एमटीएनएल) जोडण्यांवर विपरीत परिणाम होणार आहे. हा पूल पाडण्याआधी पुलावरून जाणाऱ्या एमटीएनएलच्या तब्बल आठ हजार फोनच्या वायरी दुसरीकडे हलवाव्या लागणार आहेत. त्यापकी निम्म्या, म्हणजे चार हजार फोनचे काम पूर्ण झाले असले, तरी अद्याप तीन ते साडेतीन हजार वायरी जोडण्याचे काम बाकी आहे. यात जे. जे. रुग्णालयासारख्या महत्त्वाच्या आस्थापनांमधील टेलिफोन जोडण्यांचाही समावेश आहे.
८ ते १० तारखेदरम्यान मध्य रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक
मुंबईतील १३५ वष्रे जुना म्हणजेच ब्रिटिश काळातील हँकॉक पूल डीसी-एसी परिवर्तनानंतर अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे हा पूल तोडणे रेल्वेसाठी गरजेचे असून हे काम १० जानेवारीला १८ तासांचा ब्लॉक घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे. मात्र, या पुलावरून भायखळा, सँडहर्स्ट रोड, डॉकयार्ड रोड येथील रहिवासी आणि महत्त्वाची आस्थापने यांच्या एमटीएनएलच्या टेलिफोन जोडण्या जातात. ही संख्या साडेसात ते आठ हजार एवढी प्रचंड आहे. आता हा पूल तोडण्यात येणार असल्याने या जोडण्या बदलण्याची जबाबदारी एमटीएनएलवर येऊन पडली आहे. एमटीएनएलसाठी हे काम मोठे किचकट असते. ‘हँकॉक पूल पाडण्याचा निर्णय झाल्यापासून आम्ही या गोष्टीवर काम करत आहोत. आतापर्यंत आम्ही तब्बल चार हजार दूरध्वनी संचांच्या जोडण्या बदलल्या आहेत. या बदलताना आम्ही पोलीस ठाणी, रुग्णालये, महाविद्यालये, अग्निशमन दलाची कार्यालये आदी महत्त्वाची आस्थापने यांना प्राधान्य दिले आहे. मात्र अजूनही तीन ते साडेतीन हजार जोडण्या होणे बाकी आहे. रेल्वेने १० जानेवारीला हा पूल पाडण्याचे निश्चित केल्यामुळे येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्याचे आव्हान आम्हाला पेलावे लागणार आहे,’ असे या अधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर स्पष्ट केले. दरम्यान, एमटीएनएलच्या कामकाजाशी खूप जवळचा संबंध असलेल्या खासदार अरिवद सावंत यांना याबाबत विचारले असता, केबल जोडण्याचे काम खूप किचकट असल्याचे त्यांनी सांगितले. हे काम एवढय़ा कमी वेळात पूर्ण करणे आव्हानात्मक आहे. म्हणून मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी एमटीएनएलच्या या कामाबाबत थोडा विचार करूनच मग हँकॉक पूल पाडण्याचा निर्णय घ्यावा, असे सावंत यांनी सुचवले आहे.
काम सोपे नाही
एमटीएनएलला एक जोडणी पुनस्र्थापित करण्यासाठी दोन्ही बाजूच्या केबल काढाव्या लागतात. त्यानंतर नवीन केबल दुसऱ्या बाजूच्या केबलशी तंतोतंत जुळवावी लागते. ती तशी न जुळल्यास भलत्याच नंबरला भलताच दूरध्वनी संच जोडला जातो. प्रत्येक केबलमध्ये वायरींच्या तब्बल २००० जोडय़ा असतात. या सर्व जोडय़ा विरुद्ध बाजूच्या केबलसह पडताळून घ्याव्या लागतात. त्यामुळे केवळ एक वायर उपटून दुसऱ्या बाजूच्या वायरला जोडण्याइतके ते सोपे काम नसते, असे ‘एमटीएनएल’मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2016 रोजी प्रकाशित
‘इस रूट की सभी लाइने व्यस्त हैं..’
मुंबईतील १३५ वष्रे जुना म्हणजेच ब्रिटिश काळातील हँकॉक पूल डीसी-एसी परिवर्तनानंतर अडचणीचा ठरत आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 08-01-2016 at 01:29 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway hammock bridge redevelopment start