मुंबई: करोना संसर्गाचा कमी झालेला धोका, शिथिल झालेले र्निबध यामुळे मध्य रेल्वेने मेल, एक्स्प्रेस गाडय़ांना थांबा असलेल्या मुंबईतील सहा स्थानकांचे फलाट तिकीट दर पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ५० रुपये असलेले फलाट तिकीट हे पूर्वीप्रमाणे दहा रुपये होईल, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली. याची अंमलबजावणी सीएसएमटी, दादर, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण आणि पनवेल स्थानकात गुरुवार, २५ नोव्हेंबरपासून केली जाणार आहे. करोनाचा संसर्ग वाढल्याने रेल्वे स्थानकातील गर्दी टाळण्यासाठी मार्च २०२० पासून मुंबईतील काही महत्त्वाच्या फलाट तिकीट दरात वाढ करण्यात आली होती. तो दर आता पूर्ववत केल्याचे सांगण्यात आले.