ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. टिटवाळा-खडवली स्थानकादरम्यान रेल्वे रुळाला तडा गेला असल्याने ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. यामुळे कसारा-कल्याण दरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. वासिंद, खडवली, आसनगाव दरम्यान अनेक लोकल रखडल्या आहेत. कामावर निघण्याची वेळ असल्याने अनेक प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकून पडले आहेत.

मध्य रेल्वेची वाहतूक गेल्या काही दिवसांपासून वारंवार विस्कळीत होत आहे. रविवारी खडवली-टिटवाळा स्थानकांदरम्यान रेल्वे रुळाला तडा गेल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. याआधी ३ जानेवारी रोजी शहाड आणि आंबिवली रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या रेल्वे फाटकाला डम्परने धडक दिल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातात ओव्हरहेड वायर तुटल्याने या मार्गावरील वाहतूक तासभर ठप्प होती. अपघातामुळे रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं होतं. या अपघातप्रकरणी डम्परचालकास टिटवाळा रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली.