मध्य रेल्वे मार्गावरील खोपोली ते पळसदरी या स्थानकांदरम्यान बुधवारी सकाळी झाड पडल्याने या मार्गावरील उपनगरी गाडय़ा विलंबाने धावत होत्या. सुदैवाने या घटनेचा फटका संपूर्ण मध्य रेल्वेला न बसल्याने प्रवाशांचे फार हाल झाले नाहीत. या मार्गावरील वाहतूक तब्बल पाऊण तास बंद होती. झाड हटवल्यानंतर सकाळी दहाच्या सुमारास सेवा पूर्ववत झाली.
खोपोली ते पळसदरी या दरम्यान सकाळी ९.१० वाजता एक झाड रेल्वेमार्गावर पडले. त्यामुळे दोनच लोहमार्ग असलेला हा मार्ग बंद झाला. मात्र पुढील ४५ मिनिटांत रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी हे झाड हटवून वाहतूक पूर्ववत केली. परिणामी कर्जत व खोपोलीकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला.
दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास ठाणे-वाशी मार्गावर कोपरखैरणे येथे सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने या मार्गावरील तीन सेवा रद्द करण्यात आल्या. तासाभराने या मार्गावरील वाहतूक पूर्ववत सुरू झाली.