मुंबई : राज्यातील शासकीय, महानगरपालिका, खाजगी विनाअनुदानित, तसेच अल्पसंख्याक वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील राज्य कोट्याअंतर्गत होणाऱ्या प्रवेशासाठीच्या नोंदणी प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) जाहीर केले आहे. विद्यार्थ्यांना २ ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी अर्ज भरता येणार आहे.

एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ‘डॉक्टर ऑफ मेडिसिन’ आणि ‘मास्टर ऑफ सर्जरी’हे पदव्युत्तर शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या आणि नीट पीजी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना राज्य कोट्यातून प्रवेश घेता यावे यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने अर्ज नोंदणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील राज्यातील शासकीय, महानगरपालिका, खाजगी विनाअनुदानित, तसेच अल्पसंख्याक वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या नोंदणी प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या http://www.mahacet.org या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना २ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. अर्ज नाेंदणी केल्यानंतर विद्यार्थ्यांना ३ ऑक्टोबरपर्यंत रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने नोंदणी शुल्क व अनामत रक्कम म्हणून तीन हजार रुपये भरणे आवश्यक आहे. हे नोंदणी शुल्क भरल्याशिवाय विद्यार्थ्यांचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. नोंदणी शुल्क भरल्यानंतरच विद्यार्थ्यांना त्यांच्या कागदपत्रांची रंगीत प्रत ऑनलाईन पद्धतीने संकेतस्थळावर अपलोड करता येणार आहे. विद्यार्थ्यांना ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजून ५९ मिनिटांपर्यंत ऑनलाईन पद्धतीने स्कॅन कागदपत्रे अपलोड करता येणार आहेत.

हे ही वाचा…मोफत आरोग्य सेवांमुळे आरोग्य विभागाच्या रुग्णालयात १३ कोटी रुग्णांनी घेतले उपचार!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यशस्वीरित्या अर्ज नोंदणी, नोंदणी शुल्क व अनामत रक्कम आणि कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने अपलोड केल्यानंतर राज्य कोट्यासाठी पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची तात्पुरती गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. राज्य कोटा प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी दिलेल्या वेळेत अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. या कालावधीत अर्ज नोंदणी न करणारे विद्यार्थी राज्य कोट्यातील प्रवेशासाठी पात्र ठरणार नसल्याचे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून जाहीर करण्यात आले आहे. राज्य कोट्यांतर्गत प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशासंदर्भातील माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. अर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी ही माहिती पुस्तिका सविस्तर वाचावी, त्यानंतरच अर्ज भरावेत, असे आवाहन राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून करण्यात आले आहे.