टीसीएसच्या अभियंता तरुणी इस्थर अनुह्य़ा हिच्या हत्येनंतर मारेकरी चंद्रभान सानप याने नाशिकला जाऊन एका ज्योतिषाची भेट घेतली. ग्रहमान खराब असल्याचे ज्योतिषाने त्याला सांगितले. त्यानंतर त्याने ज्योतिषाच्या सांगण्यावरून अतिगंड योग व कालसर्प योगाची शांती करून घेतली. त्यासाठी साडेतीन हजार रुपये खर्चही केला. तसेच पाप धुण्यासाठी पंचवटीच्या रामकुंडात आंघोळ केली, खंडोबाचे दर्शनही घेतले. ११ वर्षे दाढी न करण्याचा पण करीत दाढी वाढवली. व्रत म्हणून पांढरे कपडे घालायला आणि कपाळावर टिळा लावायलाही सुरुवात केली. बुलढाणा येथे जाऊनही तो देवदर्शन करीत होता.
परवान्यासाठी मुंबईत आला आणि..
चंद्रभान नाशिकला वाहनचालक म्हणून काम करीत होता. कंपनीच्या खासगी गाडय़ा भारतभर चालवत होता. त्याच्या वाहन परवान्याची मुदत संपली होती. नवीन वाहन परवाना बनविण्यासाठी तो मुंबईत ६ हजार रुपये घेऊन आला होता. त्याचे हे पैसे त्याने मद्यपान आणि वेश्यागमनात घालवले होते. त्यामुळे त्याच्याकडे फक्त १२६ रुपये उरले होते. त्यामुळे रेल्वे स्थानकात जाऊन एखाद्या प्रवाशाची बॅग आणि मोबाइल चोरी करण्याच्या उद्देशाने तो आला होता. इस्थर त्याला सावज म्हणून दिसली.
तपासाचे श्रेय कोणाला?
२ फेब्रुवारी रोजी पोलिसांना सीसीटीव्ही चित्रण मिळाले होते. त्यात इस्थरसोबत चंद्रभान दिसला होता. त्याचे छायाचित्र काढून पोलिसांनी सर्वत्र त्याचा शोध सुरू केला होता. १५ फेब्रुवारील कुर्ला रेल्वे पोलिसांना हा संशयित चंद्रभान ऊर्फ चौक्या असल्याची माहिती मिळाली. त्याला बुलढाण्याहून पोलिसांनी मुंबईत आणले. पण हत्या प्रकरणात त्याचा काही सहभाग दिसला नाही. पोलिसांनी त्याला हजेरी लावायला सांगून सोडून दिले होते. २२ फेब्रुवारी रोजी कांजूर पोलिसांनी पत्र देऊन असा एक संशयित असल्याची माहिती दिली होती. आम्हीच खऱ्या अर्थाने सानपला शोधले, असे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी धुमाळ यांनी सांगितले. परंतु आम्हाला असे कुठलेच पत्र मिळाले नसल्याचे कांजूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तुंगारे यांनी सांगितले. पण गुन्हे शाखा ७ ने सानपला ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणला. लोकमान्य टर्मिनस स्थानकातील प्रमोद ठोंबरे या हमालाने मात्र मीच चंद्रभान सानपची माहिती दिल्याचा दावा केला आहे.
चंद्रभान सानप पूर्वी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकातच हमाली करायचा. त्याची तीन लग्ने झाली आहेत. सध्या तो नाशिकला तिसरी पत्नी आणि १४ महिन्यांच्या मुलासह राहत होता. त्याच्यावर गावदेवी, नाशिक, मनमाड, मध्य प्रदेश आदी ठिकाणी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट पाटील, श्रीपाद काळे, अविनाश सांवत, नंदकुमार गोपाळे, पोलीस उपायुक्त अंबादास पोटे, साहाय्यक पोलीस आयुक्त प्रफुल्ल भोसले, साहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल ढोले, प्रवीण पाटील, संतोष सावंत, संजय सुर्वे आदींच्या पथकाने केला.
माझी मुलगी सुशिक्षित होती. कुणाच्याही मोटारसायकलीवर ती अशाप्रकारे बसेल असे वाटत नाही. तिने रात्री दहा वाजता शेवटचा फोन केला होता, मग तिच्या फोन मघल बॅलेंस कसा संपला. पोलिसांची ही थिअरी मला बोगस वाटते.
– एस. जे. एस. प्रसाद, इस्थरचे वडील