जेनेरिक औषधे विक्रीचा प्रशासनाचा विचार

गरजूंना स्वस्तात औषधे उपलब्ध व्हावीत, या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने रेल्वे स्थानकांमध्ये जेनेरिक औषधे उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेने आपल्या स्थानकांमध्ये जेनेरिक औषधे देण्यासाठी विचार सुरू केला असून त्याबाबत बैठकाही होत आहेत. लवकरच या संदर्भात निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

गरजूंना स्वस्तात औषधे उपलब्ध करण्यासाठी केंद्र सरकारने ‘जनऔषधी’ योजना सुरू केली आहे. या औषधांची किंमत ब्रॅण्डेड किंवा पेटेंट असलेल्या औषधांपेक्षाही खूप कमी असते. गरीब माणूसही ती सहजपणे विकत घेऊ शकतो. या औषधांची निर्मिती ब्रॅण्डेड औषधांसारखीच असते. त्यांच्या खरेदी व विक्रीसाठी परवाना व परवानगी घ्यावी लागते. जेनेरिक औषधे व ब्रॅण्डेड औषधे यांच्यातील किमतीमध्ये ९० टक्के फरक असतो. त्यानुसार महाराष्ट्रात एसटी महामंडळाने आपल्या स्थानक किंवा आगारात जेनेरिक औषधे देण्याचा निर्णय दोन वर्षांपूर्वी घेतला. मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. अटी व शर्तीमध्ये बरेच बदल केल्यानंतर अखेर एसटी महामंडळाने काढलेल्या निविदांना प्रतिसाद मिळू लागला.

त्यानंतर आता रेल्वे मंत्रालयाच्या निर्देशानुसार रेल्वे स्थानकांतही जेनेरिक औषधे उपलब्ध केली जाणार आहेत. त्यानुसार मध्य रेल्वेनेही विचार सुरू केला आहे. मोजक्याच पण गर्दीच्या स्थानकांत किंवा सर्व स्थानकांत सेवा देणे योग्य राहील ही बाब तपासली जात आहे. सध्या काही रेल्वे टर्मिनसमध्येच मेडिकल दुकाने आहेत. मात्र जेनेरिक औषधांची सुविधा नाही. त्यामुळे ही योजना राबविल्यास प्रवाशांना स्वस्तात चांगली औषधे स्थानकातही उपलब्ध होतील. एखाद्या प्रवाशाची तब्येत बिघडल्यास स्थानकातील स्टेशन मास्तरांच्या कार्यालयातील प्रथमोपचार पेटीतील औषधांमार्फत उपचार केले जातात. तसेच सध्या काही स्थानकांत आपत्कालीन वैद्यकीय कक्षही असून त्यातूनही प्रवासी औषधे मिळवू शकतो. मात्र स्थानकात जेनेरिक औषधांचे मेडिकल स्टोअर्स झाल्यास त्वरित औषधे उपलब्ध होऊ शकतील. त्यासाठी स्टेशन मास्तरांच्या कार्यालयातही जाण्याची गरजही भासणार नाही, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.