मुदत ठेवी आणि भिशीच्या माध्यमातून १६ टक्के व्याजाचा परतावा देण्याचे आमिष दाखवून गुडविन ज्वेलर्सच्या मालकांनी डोंबिवलीनंतर, ठाणे आणि अंबरनाथ शहरामधील हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याची घटना ताजी असतानाच असेच प्रकरण आता मुंबईमध्ये समोर आले आहे. घाटकोपरमधील पंतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सने ग्राहकांना ३०० कोटींची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रसिकालाल संकलचंद या ज्वेलर्सने शेकडो गुंतवणूकदारांकडून महिन्याला ठराविक रक्कम गुंतवण्याची योजना सुरु करुन पैसे घेतले होते. अकरा महिन्याचे हफ्ते भरा आणि बारावा हफ्ता आम्ही भरु या योजनेअंतर्गत या ज्वेलर्सने अनेक ग्राहक जोडले होते. अनेक ग्राहकांकडून मुदत ठेवीही घेतल्या होत्या. तुमच्या गुंतवणुकीवर तुम्हाला जादा व्याजदर मिळेल असं आश्वासन या ज्वेलर्सने गुंतवणुकदारांना दिल्याने शेकडो ठेवीदारांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक या ज्वेलर्सकडे केली होती.

मिड-डे या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार घाटकोपरमधील एका गुंतवणुकदाराने रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सने आपली ६० लाख ९८ हजारांना फसवणूक केल्याची तक्रार दाखल केल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. अशाप्रकारच्या तक्रारी अनेकांनी दाखल केल्यानंतर ही एकूण फसवणूक जवळजवळ ३०० कोटींची असल्याचे उघडकीस आले. ३० ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबर रोजी अनेक गुंतवणुकदारांनी रसिकालाल संकलचंद ज्वेलर्सच्या दुकानावर पैसे परत देण्याची मागणी करत धाड टाकली. भाजपाचे खासदार मनोज कोटक आणि नवनिर्वाचित आमदार पराग शाह हेही यावेळेस गुंतवणुकदारांबरोबर उपस्थित होते. ‘आपल्याकडे तुमच्या सर्व ठेवी सुरक्षित असून या केवळ अफवा आहेत,’ असं शाह यांनी यावेळी ग्राहकांना सांगितले होते.

मिळालेल्या माहितीनुसार बहुसंख्य गुंतवणुकदारांनी थेट रोख गुंतवणूक केली. या पैशामधून ज्वेलर्सने त्यामधून सोने खरेदी केले. ग्राहकांनी थेट दुकानावर धडक मारल्यानंतर ग्राहकांनी पैसे परत करण्यासाठी २४ तासाचा वेळ ज्वेलर्सच्या मालकांना दिला. या ज्वेलर्सचे संचालक जयेश शाह यांना निर्धारित वेळेमध्ये ग्राहकांचे पैसे परत करता आले नाही. याप्रकरणामध्ये पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करुन घेतला असून चौकशीला सुरुवात केली आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheating case against rasiklal sankalchand jewellers scsg
First published on: 04-11-2019 at 17:23 IST