ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे (जेडे) हत्याकांडा प्रकरणी मुंबईतील विशेष मोक्का न्यायालयाने बुधवारी कुख्यात गुंड छोटा राजन उर्फ राजन सदाशिव निकाळजे समवेत ९ जणांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. दीपक सिसोदिया वगळता यातील प्रत्येकाला २६-२६ लाख रूपयांचा दंड ही ठोठावण्यात आला आहे. छोटा राजन दिल्लीच्या तिहार तुरूंगातून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुनावणीत सहभागी झाला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पत्रकारांकडे दिलेली कबुली सबळ पुरावा

शिक्षा सुनावल्यानंतर न्यायाधीशांनी छोटा राजनला काही बोलायचे आहे का असे विचारले. तेव्हा त्याने फक्त ‘ठीक आहे’ इतकेच उत्तर दिले. नोव्हेंबर २०१५ मध्ये जेव्हा राजनला इंडोनेशियामधील बालीतून भारतात आणण्यात आले होते. तेव्हा हा खटला सीबीआयडे सोपवण्यात आला होता. कोणत्याही मोठ्या प्रकरणात दोषी ठरण्याची छोटा राजनची हे पहिलेच प्रकरण आहे. गेल्या वर्षी दिल्लीतील न्यायालयाने राजनला बनावट पासपोर्ट प्रकरणात ७ वर्षांची शिक्षा सुनावली होती.

दरम्यान, निर्दोष मुक्ततेचा आदेश ऐकताच जिग्ना व्होराच्या डोळ्यात अश्रू आले. जिग्नाने जेडेची तक्रार छोटा राजनकडे केल्याचा आरोप सरकारी पक्षाने केला होता. जेडेच्या दुचाकीचा नंबर आणि त्याच्या घराचा पत्ता ही तिने दिला होता. छोटा राजनला जेडेविरोधात भडकावले आणि जोसेफच्या मोबाइलवरून दोन वेळा राजनशी बोलणेही झाले होते. परंतु, न्यायालयाने जोसेफ आणि जिग्ना दोघांनाही निर्दोष मुक्त केले.

दरम्यान, विशेष ‘मोक्का’ न्यायालयाचे न्यायाधीश समीर अडकर यांनी ५९९ पानी निकालपत्रात राजन आणि अन्य आठ जणांना दोषी धरण्यामागील कारणमीमांसा केली. जे. डे यांची हत्या ही संघटित गुन्हाच असून तो राजनच्या संघटित गुन्हेगारी टोळीने केला आहे हे सिद्ध करण्यात पोलिसांना यश आले आहे. डे यांची हत्या ही पूर्वनियोजित कट होता हेही पोलिसांनी सिद्ध केलेले आहे, असे न्यायालयाने म्हटले. राजन याने डे यांच्या हत्येनंतर आपल्या काही साथीदारांशी, काही पत्रकारांशी संपर्क साधला होता. तसेच त्यानेच डे यांची हत्या घडवून आणल्याची कबुली दिली होती. त्याबाबत सादर केलेला पुरावा न्यायालयाने ग्राह्य धरला आहे. राजनच्या आवाजाचे नमुने सीबीआयने न्यायालयात सादर केले होते. न्यायालयाने तोही विश्वासार्ह पुरावा म्हणून ग्राह्य़ धरला आहे. ज्या काही पत्रकारांना राजनने दूरध्वनीवरून संपर्क साधून गुन्ह्य़ाची कबुली दिली होती, त्यांची साक्षही नोंदवण्यात आली. तसेच त्यांच्या साक्षीतून राजनला या प्रकरणी अडकवण्याचा त्यांचा कुठलाही हेतू नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या पत्रकारांनी दिलेली साक्ष ही विश्वासार्ह असल्याचे न्यायालयाने म्हटले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chhota rajan j dey murder jigna vohra judge
First published on: 03-05-2018 at 11:32 IST