मुंबई : शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांचा राम मंदिर आंदोलन आणि बाबरी मशीद पाडण्याशी कोणताही संबंध नाही, असे परखड मतप्रदर्शन भाजप आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी सोमवारी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल आम्हाला नेहमीच नितांत आदर राहिला आहे. पण आपण धूर्त असल्याची कबुली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे शेलार यांनी म्हटले आहे. राम मंदिर आंदोलनातील शिवसेनेच्या सहभागाचे पुरावे राऊत यांनी सादर केल्यावर प्रत्युत्तर देताना शेलार यांनी उत्तरप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री कल्याणसिंह यांच्या मुलाखतीची ध्वनिचित्रफीत सादर केली. बाबरी मशिदीचा ढाचा पाडला गेल्याबाबत आपल्याला कोणतीही खंत नाही, असे त्यांनी नमूद केले होते. त्याबाबत माहिती देवून शेलार म्हणाले, खासदार विद्याधर गोखले हे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे होते व शिवसेनेचा त्यांच्याशी संबंध नव्हता. मोरेश्वर सावे आणि सतीश प्रधान यांना शिवसेनेत कधीच चांगली वागणूक दिली गेली नाही. शिवसेना नेत्यांसह राऊत हे कधीच आंदोलनात सहभागी झाले नाहीत. इतिहास बदलण्याची ताकद राऊत यांच्यामध्ये नाही. तुम्हाला इतिहास माहीतच नाही. तुम्ही म्हणजे, मराठी, मुंबई किंवा महाराष्ट्रही नाही, असे शेलार यांनी नमूद केले. भाजपने हिंदुत्वाच्या आडून बाळासाहेब ठाकरे यांना नेहमीच फसविले, ते भोळे होते, पण मी तसा नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘ लोकसत्ता ‘ च्या ‘दृष्टी आणि कोन ’ या वेबसंवादात रविवारी सांगितले. होते व अन्यही मुद्दय़ांवर भाष्य केले होते. त्यासंदर्भात शेलार म्हणाले, स्मार्ट सिटी ही केंद्र सरकारची योजना जर थोतांड असेल, तर ब्रिमस्टोवॅड हा काही सुवर्णजयंतीचा कार्यक्रम आहे का, जे मुंबईत २२ वर्षे पर्जन्य जलवाहिन्या टाकू शकले नाहीत, ते स्मार्ट सिटीवर बोलत आहेत. त्यामुळे सूर्यावर थुंकण्याचे काम शिवसेना नेत्यांनी करू नये.