कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रालगतच्या २७ गावांच्या आणि भिवंडी परिसरातील ६० गावांच्या प्रारूप विकास आराखड्यास मंजुरी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी घेतला.
कल्याण येथे सोमवारी झालेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये कल्याण-डोंबिवली लगतच्या २७ गावांच्या विकास आराखड्यांचा प्रश्न दोन दिवसात सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार मंगळवारी मंत्रालयात नगरविकास विभाग, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नगररचना संचालनालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावली होती. या विकास आराखड्यांबाबत नगरविकास विभागामार्फत या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर झालेल्या सविस्तर चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी हे दोन्ही विकास आराखडे मंजुर करण्याचा निर्णय घेतला.
फडणवीस म्हणाले, मुंबई लगतचा हा परिसर असल्याने त्याचा झपाट्याने विकास होत आहे. त्यामुळे या भागात दळणवळणाच्या सुविधा, सांडपाणी निचरा व्यवस्था, रस्ते आदी विकास योजनांचे नियोजन पुढील २० वर्षांच्या लोकसंख्येचा आणि विकासाचा दर लक्षात घेऊन करावे. कल्याण-डोंबिवली लगतच्या २७ गावांच्या विकासासाठी या ठिकाणी एखादी नगरपरिषद करता येईल काय, याबाबतही विचार करण्यात यावा. या परिसरात होणारा विकास लक्षात घेता या भागात परवडणारी घरे योजना लागू करावी, यादृष्टीनेही नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
भिवंडी परिसर लगतच्या ६० गावांच्या विकास योजनेच्या आराखड्यासही सविस्तर चर्चेअंती मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. या परिसरात लॉजिस्टिक हब विकसित झाल्यास राज्य शासनाच्या महसुलात वाढ होईल, त्या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.