राज्याचे नवे मुख्यमंत्री हे तंत्रप्रेमी असल्याचे सर्वश्रुत आहेच. आगामी काळात राज्य सरकारचा कारभार तंत्रज्ञानात अग्रेसर करायचा ध्यास त्यांनी घेतला आहे. यामुळेच जनतेपर्यंत पोहोचण्यासाठीही त्यांनी समाजमाध्यामांची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात एक पाऊल पुढे टाकत लवकरच मुख्यमंत्र्यांची एक यू टय़ूब वाहिनी सुरू होणार आहे.
तंत्रप्रेमी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक प्रचाराच्या काळात फेसबुक, ट्विटर आणि यू टय़ूब यासारख्या समाजमाध्यमांचा प्रभावी वापर करत जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न यशस्वीही झाला. एका क्लिकवर लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यास उपयुक्त असे हे समाजमाध्यम राज्याच्या विकासासाठीही वापरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. यामुळेच मुख्यमंत्री कार्यालयात भाजपच्या समाजमाध्यम विभागातील निधी कामदार यांची विशेष नियुक्ती केली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांचे फेसबुक खाते आणि ट्विटर हँडल हाताळण्यास सुरुवातही केली. याचबरोबर भविष्यात यू टय़ूब वाहिनीही सुरू करण्यात येणार असल्याचे कामदार यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री विविध ठिकाणी दौऱ्यावर असताना जी भाषणे करतात त्या भाषणांचे व्हिडीओ तातडीने या वाहिनीवर पाहण्यास मिळतील. त्याचबरोबर विविध सरकारी किंवा खासगी संस्थांच्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्री जी भूमिका मांडतात त्याच्या ‘व्हिडीओ क्लिप्स’ही या वाहिनीवर अपलोड करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. फेसबुक आणि ट्विटरचा वापर प्रभावी करणार असून सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय ट्विटरवर राज्य सरकारच्या संकेतस्थळाची जोडणी देत प्रसिद्ध केला जाणार असल्याचेही कामदार यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांची यू टय़ूब वाहिनी लवकरच सुरू होणार असून त्या संदर्भातील तांत्रिक बाबींची तपासणी सुरू आहे.

घरबसल्या सरकारी कामे
नवीन वर्षांच्या सुरुवातीला ही वाहिनी सुरू होण्याची शक्यताही सूत्र व्यक्त करत आहेत. तरुण पिढीला आकर्षित करण्यासाठी आणि सरकार काय करते हे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी या माध्यमांचा पुरेपूर वापर करून घ्यायची तयारी मुख्यमंत्री कार्यालयाने सुरू केली आहे. तसेच राज्यातील अनेक सरकारी कामे ही घरबसल्या संगणकावरून कशी करता येईल यासाठी सरकारने विशेष पुढाकार घेतला असून एप्रिल २०१५ पर्यंत अनेक सेवा ऑनलाइन होणार आहेत.