स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेतील ऐतिहासिक भाषणास १२० वर्षे आणि जयंतीस १५० वर्षे झाल्यानिमित्ताने रामकृष्ण मिशनने येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्यपाल के. शंकरनारायण उपस्थित राहणार असताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून मात्र या कार्यक्रमाच्या निमंत्रणास प्रतिसादही मिळालेला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील या कार्यक्रमाला हजर राहणार की नाही याबद्दलही संदिग्धताच आहे.
स्वामीजींचा शिकागोसाठीचा प्रवास ३१ मे १८९३ रोजी मुंबईतून ‘एस एस पेनिन्सुलर’ या बोटीवरून सुरु झाला. त्याला १२० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने रामकृष्ण मिशनने ३१ मे रोजी एका कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्यास राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, राज्यपाल के. शंकरनारायणन, माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी,मनोहर जोशी आदी उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात होणार आहे.  या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती येणार असून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही त्यासाठी निमंत्रण देण्यात आले. पण त्यांच्याकडून आयोजकांना काहीच कळविण्यात न आल्याने निमंत्रण पत्रिकेत अखेर त्यांची नावे वगळण्यात आली आहेत. मात्र त्यांनी होकार दिला, तर लगेच नव्याने निमंत्रण पत्रिका तयार करता येतील, असेही सूत्रांनी सांगितले.