मुंबई: राजस्थानमधील काँग्रेस सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरले असून विकासाच्या बाबतीत हे राज्य १५ वर्षे मागे गेले आहे. विकासापासून वंचित राहिलेल्या राजस्थानमध्ये आता महाराष्ट्राप्रमाणे डबल इंजिन सरकारची गरज असून राज्यातील भगवे वातावरण पाहता परिवर्तन अटळ असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरूवारी केले.

राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी २५ नोव्हेंबर रोजी मतदान होत असून प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदे यांनी भाजपा उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. शिंदे यांनी जयपूरसह काही ठिकाणी रोड शो केला. तसेच कोटपुतली विधानसभा मतदार संघात हंसराज पटेल यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभा घेतली. राजस्थानमध्ये भगवी लाट असून यावेळी भाजपाचे सरकार बहुमताने सत्तेवर येईल. गेल्या पाच वर्षांत काँग्रेस सरकारने लोकांनी फसवणूक केली असून राज्यात रस्त्यांची दुरावस्था आहे. तसेच भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचारात राजस्थानमध्ये वाढ झाली असून सरकारने शेतकऱ्यांची फसणूक केल्याचा आरोप शिंदे यांनी केला. केंद्रातील मोदी सरकारच्या पािठब्यामुळे महाराष्ट्रात जोरदार विकासकामे सुरू आहेत. नमो शेतकरी सन्मान योजनेंतर्गत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वार्षिक १२ हजार रुपये दिले जात असुून राजस्थानध्येही ही योजना सुरू करण्याची ग्वाही भाजपाने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्याा पाठिशी खंबीरपणे उभे राहत असून महाराष्ट्राप्रमाणे राजस्थानमध्येही डबल इंजिन सरकार आल्यास राज्याची प्रगती होईल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.