‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ (आयआयटी) या देशातील अग्रगण्य अभियांत्रिकी शिक्षणसंस्थेमधील प्रवेश निश्चित करणाऱ्या जेईई-अॅडव्हान्स या सामाईक प्रवेश परीक्षेत राजस्थानच्या चित्रांग मुरदिया हा विद्यार्थी प्रथम आला असून त्याने ३६० पैकी ३३४ गुण मिळविले आहेत. तर मुलींमध्ये पंजाबमधील जालंदरची आदिती प्रथम आली आहे. आदिती देशाच्या गुणवत्ता यादीत सातव्या क्रमांकावर आहे. मात्र, पहिल्या १००मध्ये अवघ्या पाच मुली आहेत.
दहावी-बारावी परीक्षेत आपल्या गुणवत्तेची चमक दाखविणाऱ्या मुलींची जेईई-अॅडव्हान्समधील कामगिरी मात्र अगदीच निराशाजनक आहे. एकूण प्रवेशपात्र विद्यार्थ्यांमध्ये केवळ ११ टक्के मुली आहेत. मुलींची कामगिरी इतकी वाईट का, असा प्रश्न आदितीला विचारता ती म्हणाली, ‘बहुतांश मुलींचा ओढा वैद्यकीय किंवा वाणिज्य शाखेकडे असतो. मुली चांगल्या अभियंत्या बनू शकत नाहीत असे नाही. पण, अभियांत्रिकीकरिता त्यांना घरातूनही फारसे प्रोत्साहन मिळत नाही, असे माझे निरीक्षण आहे.’ आपल्या आई-वडिलांनी मात्र नेहमीच आपल्याला या शाखेत प्रवेश घेण्याकरिता प्रोत्साहन दिल्याचे ती सांगते. आदिती जालंधरच्या स्वामी संत दास पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी असून तिने बारावीच्या परीक्षेत ९५.४ टक्के गुणांची कमाई केली होती. आदितीला दिल्लीच्या आयआयटीत संगणक विज्ञानाला प्रवेश घ्यायचा असून प्रशासकीय सेवेत करिअर करायचे आहे.
रोज १० ते १२ तास अभ्यास करणाऱ्या चित्रांगला संशोधनात रस आहे. त्याला मुंबई आयआयटीत प्रवेश घ्यायचा असून संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग यापैकी एकाची निवड करेन, असे त्याने सांगितले. चित्रांग उदयपूरच्या दिल्ली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी असून दहावीत त्याने ९७ टक्के गुणांची कमाई केली होती. त्याने कोटा येथील कोचिंग क्लासमधून मार्गदर्शन घेतले होते. जेईईत यश मिळविण्यासाठी अभ्यासात सातत्य आवश्यक आहे. तसेच, अधूनमधून येणारे अपयश पचविण्याचीही तुमची तयारी असायला हवी, अशा शब्दांत त्याने आपल्या यशाचे गमक सांगितले.
जेईई-मेन्समधून निवडण्यात आलेल्या १,२६,९९७ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी २७,१५१ विद्यार्थ्यांना प्रवेशाकरिता पात्र ठरविण्यात आले आहे. यापैकी १९,४१६ विद्यार्थी सर्वसाधारण गुणवत्ता यादीत आहेत. तर ६००० ओबीसी, ४,४०० अनुसूचित जाती आणि १,२५० अनुसूचित जमातींकरिता राखीव असलेल्या गुणवत्ता यादीकरिता निवडले गेले आहेत. शारीरिकदृष्टय़ा विकलांग विद्यार्थ्यांकरिता राखीव असलेल्या जागांकरिता २४३ विद्यार्थ्यांना प्रवेश पात्र ठरविण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाची जेईई-अॅडव्हान्समधील विद्यार्थ्यांची कामगिरी उंचावल्याचे दिसते. कारण यंदा प्रवेश पात्र विद्यार्थ्यांच्या संख्येत गेल्या वर्षीच्या तुलनेत साडेतीन हजारांनी वाढ झाली आहे.
प्रवेशप्रक्रिया शुक्रवारपासून
आयआयटीची प्रवेश प्रक्रिया शुक्रवार २० जूनपासून सुरू होणार आहे. देशातील १६ आयआयटींमधील ९,७८४ जागांवरील प्रवेशांकरिता या विद्यार्थ्यांमध्ये चुरस असणार आहे. या शिवाय धनबाद येथील इंडियन स्कूल ऑफ माइन्स या संस्थेतील प्रवेशही या परीक्षेच्या आधारे करण्यात येणार आहेत. या परीक्षेच्या माध्यमातून आर्किटेक्चर शाखेच्या प्रवेशांकरिता प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना २६ जूनला ‘आर्किटेक्चर अॅप्टीटय़ूड टेस्ट’ या आणखी एका परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
राज्यात कपिल वैद्य, शलाका कुळकर्णीचे यश
महाराष्ट्रातून अकोल्याचा कपिल वैद्य पहिला आला आहे. तर मुंबईची शलाका कुळकर्णी राज्यात मुलींमधून पहिली आली आहे. ती देशभरातून ५४व्या स्थानावर आहे. हिमांशु गणवीर हा नागपूरचा विद्यार्थी अनुसूचित जातींसाठीच्या गुणवत्ता यादीतून पहिला आला आहे.
दोन वर्षांतील मेहनतीचे हे यश
दोन वर्षांत केलेल्या मेहनतीचे हे यश आहे. मला आयआयटी मुंबईत संगणक विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. मी यशाचे सर्व श्रेय माझ्या आई वडिलांना आणि माझ्या सर्व शिक्षकांना देईन. रोज ६-७ तास केलेला अभ्यास आणि त्यासासाठी केलेले वेळेचे नियोजन यामुळेच मी हा खडतर प्रवास पूर्ण करू शकलो आहे.
– कपिल वैद्य, राज्यात सर्वप्रथम
स्वप्न पूर्ण झाले..
निकालानंतर खूपच आनंद झाला आहे. दहावीनंतरच मी आयआयटीत जाण्याचा निश्चय केला होता. या परीक्षेत पहिल्या शंभरात येणे हे माझे स्वप्न होते. ते मी आज पूर्ण केले आहे. मी आयआयटी मुंबईमध्ये प्रवेश घेणार असून इलेक्ट्रिकल इंजिनीअिरगसाठी प्रवेश घेणार आहे. वेळेचे योग्य नियोजन केल्यामुळेच मी याठिकाणी पोहचू शकले आहे.
– शलाका कुलकर्णी, राज्यात मुलींमध्ये सर्वप्रथम
‘सुपर ३०’चे यश
समाजातील ३० निवडक हुशार पण गरीब आणि मागास वर्गातील विद्यार्थ्यांना आयआयटी प्रवेशाकरिता मोफत कोचिंग देणाऱ्या ‘सुपर ३०’ या गटामधील २७ विद्यार्थी जेईई-अॅडव्हान्समधून प्रवेश पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना या गटाच्या माध्यमातून मार्गदर्शन करणारे आनंदकुमार यांना केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेशाची संधी मिळूनही गरीबीमुळे त्यावर पाणी सोडावे लागले होते. तेव्हापासून ‘सुपर ३०’ नामक गटाच्या माध्यमातून समाजातील वंचित आणि गरीब कुटुंबातील मुलांना जेईई प्रवेशांकरिता आनंदकुमार मोफत मार्गदर्शन करीत असतात. गेल्या सात वर्षांत अशा शेकडो विद्यार्थ्यांचा आयआयटी प्रवेशाचा मार्ग या गटाच्या माध्यमातून सुकर झाला आहे. या वेळी प्रवेश पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही जणांचे पालक फेरीवाले, किराणा व्यापार करणारे आहेत.