पाचव्या-सहाव्या मार्गिकेचा विरापर्यंत विस्तार करण्याचा प्रस्ताव; पश्चिम रेल्वेकडून सर्वेक्षण

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाडय़ांमुळे उपनगरीय रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक कोलमडू नये, म्हणून मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान टाकण्यात येत असलेल्या पाचव्या-सहाव्या मार्गिका विरापर्यंत नेण्याचा पश्चिम रेल्वेचा विचार आहे. तसे झाल्यास विरारहून मुंबई व परतीचा प्रवास जलद आणि आरामदायी होण्याची शक्यता आहे. यासाठी पश्चिम रेल्वेकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे.

पश्चिम रेल्वेमार्गावरून धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी स्वतंत्र मार्ग उपलब्ध व्हावा व त्याच वेळी उपनगरीय गाडय़ांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम होऊ नये, या उद्देशाने पश्चिम रेल्वेने मुंबई सेंट्रल ते बोरिवलीपर्यंत पाचवी आणि सहावी मार्गिका टाकण्याचा योजना आखली आहे. यातील पाचवा मार्ग पूर्ण करण्यात आला असून त्यावरून सध्या बोरिवलीपर्यंत नऊ फेऱ्या चालवण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे सहावी मार्गिका २०१९पर्यंत पूर्ण करण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे. या दोन अतिरिक्त मार्गिकांमुळे पश्चिम रेल्वेवरील बोरिवलीपर्यंतची वाहतूक सुरळीत होणार आहे. मात्र, या मार्गिकांचा विस्तार विरापर्यंत करून उपनगरी मार्गावरील संपूर्ण वाहतूक जलद करण्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाचे ध्येय आहे.

मुंबई सेंट्रल-बोरिवलीदरम्यानच्या पाचव्या-सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गिकांचा विरापर्यंत विस्तार करण्यात येईल.  बोरिवली ते विरापर्यंत सध्या चारच मार्ग असून पाचवा आणि सहावा मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे लांब पल्ल्याच्या गाडय़ा आणि जलद लोकल फेऱ्यांचा ताण तिसऱ्या आणि चौथ्या मार्गावर पडत आहे. लांब पल्ल्याच्या गाडय़ा याच मार्गावरून धावत असल्याने विरारला जाणाऱ्या आणि विरारहून सुटणाऱ्या जलद लोकल गाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होतो आणि लोकल फेऱ्या उशिराने धावतात. एकंदरीतच बोरिवली ते विरारचा प्रवास सुकर करण्यासाठीच या दरम्यान पाचवा आणि सहावा मार्ग बांधण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती देण्यात आली.

खर्च दुप्पट

सध्या बोरिवलीपर्यंत सहाव्या मार्गाचे काम सुरू आहे. या प्रकल्पाचा सुरुवातीचा खर्च ४३० कोटी रुपये होता आणि हाच खर्च आता ९१८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. जमीन संपादन यासह काही तांत्रिक अडचणी यामुळे प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी दोन ते तीन वर्षे उशीर झाला. हे काम पूर्ण झाल्यानंतर बोरिवली ते विरार पाचवा-सहाव्या मार्गाचा सर्व बाजूने विचार केला जाईल. सध्या या प्रस्तावावर विचार सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बोरिवली ते विरार पाचव्या आणि सहाव्या मार्गाचा प्रस्ताव विचाराधीन आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबतही चर्चा केल्यानंतर या नवीन मार्गाचा विचार केला जात आहे. सर्वेक्षण केल्यानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे.    – मुकुल जैन, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पश्चिम रेल्वे