प्रश्नपत्रिका क्रमांक एकची फेरपरीक्षा लवकरच
शिक्षकांच्या नियुक्तीसाठी घेण्यात आलेल्या ‘टीचर्स एलिजिबिलीटी टेस्ट’ (टीईटी) म्हणजेच ‘शिक्षक पात्रता चाचणी’ परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाची ‘सीआयडी’मार्फत चौकशी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. तसेच या फुटलेल्या ‘क्रमांक १’च्या प्रश्नपत्रिकेची फेरपरीक्षा लवकरच घेण्यात येणार आहे.
१६ जानेवारीला झालेल्या या परीक्षेची प्रश्नपत्रिका सकाळी ९च्या सुमारास व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून फिरू लागली होती. बीडमधील एका पत्रकाराच्या भ्रमणध्वनीवर ही १५० प्रश्नांची प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्यांनी ही बाब शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. प्रश्नपत्रिका फुटल्याचे निष्पन्न झाल्याने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शालेय शिक्षण सचिव नंदकुमार यांना पेपरफुटीची चौकशी करण्याचे आदेश दिले. या चौकशीत क्रमांक १ची प्रश्नपत्रिका फुटल्याचे निष्पन्न झाले असून लवकरच या पेपरची फेरपरीक्षा घेतली जाणार आहे.
शिक्षक पात्रता चाचणी परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्यात येईल. भविष्यात अशा घटनांना आळा बसावा आणि गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी ही चौकशी गरजेची आहे, असेही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी स्पष्ट केले.
पेपर छपाई, वितरण व्यवस्था या बाबींमध्ये काही त्रुटी संभवतात. बीड जिल्ह्य़ात दोन ठिकाणी, तर धुळे, पुणे शहरात पेपरफुटी झाल्याचे निरीक्षण प्राथमिक चौकशीत सचिवांनी नोंदविले आहे. यात चारही ठिकाणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, या परीक्षेचे आयोजक असलेल्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार प्राथमिक शिक्षण संचालक महावीर माने यांच्याकडून काढून घेण्यात आला आल्याचेही तावडे यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2016 रोजी प्रकाशित
‘टीईटी’ पेपरफुटीची ‘सीआयडी’ चौकशी
पेपरफुटी प्रकरणाची ‘सीआयडी’मार्फत चौकशी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 04-02-2016 at 00:20 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cid inquiry of tet paper leak