स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत प्रस्ताव

मुंबई : मुंबईमधील सात परिमंडळांतील लहान व मोठय़ा नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी पालिकेने कंत्राटदार नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सात परिमंडळातील मोठय़ा नाल्यांमधील व शहर भागातील छोटय़ा नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी पालिका ७८ कोटी रुपये खर्च करणार आहे. तर पश्चिम उपनगरांतील लहान नाले, पेटिका नाल्यांच्या सफाईसाठी ५२ कोटी रुपये खर्च  करण्यात येणार आहेत. त्यामुळे यंदा नालेसफाईवर एकूण १३० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत याबाबतचे प्रस्ताव पटलावर ठेवण्यात आले आहेत. मुंबईतील नालेसफाई वर्षभर तीन टप्प्यात होत असून पावसाळापूर्व नालेसफाई एप्रिलपासून सुरू होते.   वर्षभराचे नियोजन करण्यासाठी डिसेंबरपासूनच नालेसफाईच्या निविदा मागवल्या जातात.

गेल्या दोन वर्षांपासून १०० टक्क्यांच्या पुढे गाळ काढल्याचा दावा पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी केला होता. तरीही मुंबईत पाणी तुंबल्यामुळे नालेसफाई झालीच नसल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला होता. त्यामुळे यंदाही नालेसफाईवर पालिका कोटय़वधी रुपये खर्च करणार आहे. त्याबाबतचे प्रस्ताव स्थायी समितीच्या शेवटच्या बैठकीत मांडण्यात आले आहेत. सात परिमंडळातील मोठय़ा नाल्यांमधील गाळ काढण्यासाठी पालिका एकूण ७८ कोटी खर्च करणार आहे. छोटय़ा नाल्यांमधील व मिठी नदीतील गाळ काढण्यासाठीचा खर्च यापेक्षा वेगळा असणार आहे.  नालेसफाईची कामांपैकी ७० टक्के कामे ही पावसाळय़ापूर्वी केली जातात. तर १५ टक्के पावसाळय़ादरम्यान, तर १५ टक्के पावसाळय़ानंतर करण्यात येतात. एप्रिल महिन्यापासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात होते.

४८ कामांसाठी दरवर्षी निविदा

नालेसफाईच्या साधारण ४८ कामांसाठी दरवर्षी निविदा मागवाव्या लागतात. मुंबईतील मोठे नाले, छोटे नाले तसेच मिठी नदी यांची एकूण लांबी ही सुमारे ६८९ किमी एवढी आहे.

छोटय़ा नाल्यांमधील गाळासाठी ५२ कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पश्चिम उपनगरातील छोटे नाले, पेटीका नाले, तसेच रस्त्यालगतच्या पर्जन्य जलवाहिन्या आणि पातमुखे यामधील गाळ काढण्यासाठी पालिकेने कंत्राटदारांची निवड केली असून त्याकरिता ५२ कोटी खर्च येणार आहेत. त्यामुळे नालेसफाईचा एकूण खर्च १३० कोटींवर जाणार आहे.