जयंत पाटील मुख्य सचिवांवर पुन्हा संतापले

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावण्यावरून निर्माण झालेला वाद ताजा असताना विभागाच्या विविध कामांच्या मंजूर नस्ती पुन्हा वित्त विभागाकडे पाठविण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना चांगलेच धारेवर धरत नाराजी व्यक्त केली. असेच चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करून टाका, असे संतप्त उद्गारही त्यांनी काढले.

काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीतही जयंत पाटील यांनी अशाचप्रकारे मुख्य सचिवांना लक्ष्य केले होते.  आज पुन्हा एकदा जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांवर हल्लाबोल केल्याने बैठकीत उपस्थित मंत्री चकित झाले. पावसाळ्याच्या तोंडावर विभागाची विविध सिंचन प्रकल्प आणि कालव्यांशी संबंधित काही तातडीची कामे प्रस्तावित आहेत. या कामांना वित्त विभागाची मान्यता मिळाली असून नस्ती मंजूर झाल्यानंतर त्यावर पुढील कार्यवाही करण्याऐवजी कुंटे यांनी या नस्ती पुन्हा वित्त विभागाकडे पाठविल्यावरून पाटील नाराज असल्याचे बोलले जाते. याबाबत त्यांनी  मंत्रिमंडळ बैठकीतच कुंटे यांच्याकडे विचारणा करीत संताप व्यक्त  केला. मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा विभागाचा प्रस्ताव मंजूर होऊन त्याचे इतिवृत्त मंजूर करण्यात आले होते. असे असताना ती फाइल वित्त विभागाकडे का पाठवली अशी विचारणा करीत जयंत पाटील यांनी मुख्य सचिवांबद्दल नाराजी व्यक्त केली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केलेल्या कामांबद्दल असे होत असेल तर मंत्रिमंडळाच्या वर कोण आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर कोणती फाइल ते पाहून सांगता येईल असे सांगत कुंटे यांनी पाटील यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यावर असेच चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करून टाका अशा शब्दांत पाटील यांनी कुंटे यांना सुनावल्याचे समजते. अखेर याबाबत आपण माझ्याकडे या, मार्ग काढू असे पाटील यांना सांगत मुख्यमंत्र्यांनी वादावर पडदा टाकल्याचे सूत्रांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Close the water resources department akp
First published on: 13-05-2021 at 01:48 IST