राज्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. उजनी धरण १०० टक्के भरले असतानाही नियोजन झालेले नसल्याने पिण्याच्या पाण्याचा सावळागोंधळ निर्माण झाला आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केला.
खडकवासला, टेमघर या धरणातही पाणी कमी आहे. त्यामुळे या परिसराला पाणी मिळत नाही याला जबाबदार कोण आहे? असा सवाल करत त्यांची चौकशी होऊन कारवाई करावी अशी मागणीही यावेळी अजित पवार यांनी केली. विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, आमदार राजेश टोपे, आमदार प्रणिती शिंदे यांनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित केला होता.
उजनीचं पाणी सोलापूरला मिळत नाही, असा मुद्दा काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. यावर राज्यात पाणी पुरवठा योग्य प्रमाणात केला जात असल्याचे उत्तर गिरीश महाजन यांनी दिले. तसेच यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील पाणी टंचाई व मराठवाड्यातील पाण्याचा साठा याची माहिती दिली. त्यानंतर सभागृहात गदारोळ झाला त्यामुळे सभागृहाचे कामकाज १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.
दरम्यान, विदर्भ-मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्रातील धरणं आटली आहेत असा तारांकित प्रश्न चर्चेला आला. शेवटी सभागृहात निर्माण झालेला गदारोळ लक्षात घेत अर्थमंत्री व राज्यपालांच्या निर्देशानुसार सिंचन प्रकल्पांना निधी वितरित करण्यात आला आहे. अपूर्ण सिंचन प्रकल्पांना निधी देऊ, उजनी शंभर टक्के भरलं होतं हे खरं आहे, कालवा सल्लागार समितीने नियोजन करूनच पाणी सोडलं आहे, शेतकरी खूश आहेत. मुबलक पाणी आम्ही त्यांना देत आहोत त्यामुळे ढिसाळ नियोजनाचचा आरोप चुकीचा आहे, अशा शब्दांत गिरीश महाजन यांनी विरोधकांचा आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.