लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जी काही कारवाई करते आहे ती नियमानुसार असून, कोणाहीविरुद्ध सूडबुद्धीने किंवा आकसाने कारवाई केली जात नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सकाळी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्या मुंबई, नाशिकमधील विविध घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकले. या कारवाईसंदर्भात प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, सत्तेवर आलो तेव्हाच आम्ही कायद्यानुसार काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते. सरकार कोणाशीही सूडबुद्धीने वागत नाही. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱयांकडून सध्या जी कारवाई होते आहे. ती नियमानुसारच सुरू आहे. त्याचबरोबर न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई केली जात आहे. त्यामुळे आम्ही कोणाशीही सूडबुद्धीने किंवा आकसाने वागण्याचा प्रश्नच येत नाही, असे त्यांनी सांगितले. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग स्वतंत्रपणे काम करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.