मुंबई: उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, महापालिका, जिल्हा परिषदांची प्रभाग रचना, मराठा समाजाचे आंदोलन आणि सरकारमधील अंतर्गत वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दोन सहकारी उपमुख्यमंत्र्यांसोबत शुक्रवारी रात्री ‘वर्षा’ निवासस्थानी खलबते केली.
उपराष्ट्रपती पदाची येत्या ९ सप्टेंबरला निवडणूक होत असून भाजप नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन निवडणूक लढवत आहेत. राज्यातील एक मतदान उपराष्ट्रपतीपदासाठी होत असल्याने राज्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी मदत करावी यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी दूरध्वनीवरुन संवाद साधत राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. मात्र दोन्ही नेत्यांनी फडणवीस यांची विनंती फेटाळून लावल्यानंतर आता महाविकास आघाडीची मते फोडून या दोन्ही नेत्यांना धडा शिकविण्याच्या हालचाली महायुतीकडून सुरू झाल्या आहेत.
मराठा समाजाच्या आंदोलनावर चर्चा
मराठा आरक्षण व अन्य मागण्यांसाठी मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात येत्या २९ ऑगस्टपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करणार आहे. मनोज जरांगे यांच्या यापूर्वी झालेल्या आंदोलनाला मराठा समाजाचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. गणेशोत्सवादरम्यान होणाऱ्या आंदोलनामुळे मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन हे आंदोलन होऊ नये यासाठी प्रयत्न सुुरु झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक घेत सविस्तर चर्चा केली.
या बैठकीत उपराष्टपती निवडणुकीत मतदानासाठी पक्षादेश लागू होत नसल्याने महाविकास आघाडीतील नाराज आमदारांची मते फोडण्याबाबत आखणी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याचप्रमाणे मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन होऊ नये यासाठी त्यांची समजूत काढण्याबाबतही चर्चा झाल्याचे समजते.
महापालिका निवडणुकीच्या प्रभाग रचना जाहीर होत आहेत. या प्रभाग रचनेवरुन सत्ताधारी महायुतीमधील तिन्ही घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर वाद सुरू झाले आहेत. हे वाद मिटविण्यासाठी तसेच प्रभाग रचनेबाबत वरिष्ठ पातळीवरच निर्णय होण्याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते.
उपमुख्यमंत्री शिंदे अनेक दिवसांनी बैठकीला उपस्थित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून मंत्रालयात फिरकलेले नाहीत. राज्य मंत्रिमंडळाच्या दोन बैठका, मंत्रिमंडळ पायाभूत समितीची बैठक तसेच मुख्यमंत्र्यांसोबतच्या पाच-सहा कार्यक्रमांवर शिंदे यांनी अषोघित बहिष्कार टाकला होता. मात्र शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी बोलाविल्यानंतर शिंदे यांनी बैठकीत सहभागी होऊन आपला बहिष्कार मागे घेतल्याची चर्चा मंत्रालयात रंगली होती.