भाजप प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षासह शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीला चांगलेच झोडपून काढले. शेतकरी सुकाणू समितीचा उल्लेख ‘जीवाणू’ समिती असा करत मला कोणाची औकात काढायची नाही. केवळ अराजकता माजवण्यासाठी संपूर्ण कर्जमाफीची आंदोलकांकडून मागणी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हे आधीच्या सरकारसारखे बेईमान सरकार नाही, असा टोलाही लगावला. आघाडी सरकारने खोदलेले खड्डे आम्ही बुजवत आहोत. विरोधकांच्या आंदोलनात कार्यकर्तेही नसल्याची खिल्ली देखील त्यांनी उडवली. तसेच आपण दिल्लीत जाणार नाही व रावसाहेब दानवेही प्रदेशाध्यक्षपदावर कायम राहणार असल्याचे ठणकावून सांगत माध्यमांवरही तोंडसुख घेतले. त्यांना दुकानदारी चालवावी लागत असल्याने ते असे मुद्दे पुढे रेटतात असे वक्तव्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्र्याच्या टीकेचा रोख विशेषत: शेतकरी सुकाणू समितीवर होता. जे लोक निवडूनही येऊ शकत नाहीत ते लोक या समितीत आहेत. पण त्यांना कधी विरोध केला नाही. मात्र संपूर्ण कर्जमाफीची मागणी करून यांना अराजकता माजवायची आहे. त्यांना फक्त लोकांना झुंजवत ठेवायचं होतं. १५ ऑगस्टला झेंडा फडकवण्यास विरोध करणारे हे देशद्रोही आहेत, अशा शब्दांत टीका करत मला कोणाची औकात काढायची नाही असा टोलाही लगावला. या शेतकरी आंदोलनामागे केवळ राजकीय हेतू होता, असा आरोप त्यांनी केला. आंदोलन करा पण ते विधायक पद्धतीने करा, असा सल्लाही त्यांनी दिला.

त्यांनी विरोधकांनाही यावेळी सोडले नाही. ते म्हणाले,  स्वामिनाथन आयोग लागू करण्याची मागणी विरोधक करत आहेत. परंतु, २००४ सालीच स्वामिनाथन यांनी आपला अहवाल सादर केला होता. इतके वर्षे यांचीच सत्ता होती. वर्ष २०१४ मध्येच तुम्हाला जाग आली का, असे म्हणत इतक्या वर्षे तुम्ही झोपले होते, काय असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

विचारांची प्रतिबद्धता ठेवणाऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची फळी असल्यामुळेच भाजपला यश मिळत असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे सामान्य माणसाला सरकार आपले वाटू लागले आहे. देशात परिवर्तन फक्त मोदीच करू शकतील, असा विश्वास त्यांना वाटतो, असे म्हणत मोदींनी भ्रष्टाचाराविरोधात सुरू केलेली ही लढाई जनतेला भावली असल्याचे ते म्हणाले.

तसेच पुढील महिनाभर भाजप कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे अर्ज भरून देण्याचे आवाहन केले. कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना मदत केल्यास गरजूपर्यंत ही मदत पोहोचेल असे ते म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis slams on shetkari sukanu samiti congress ncp in bjp state meeting
First published on: 17-08-2017 at 17:06 IST