मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता सडकून टीका केली आहे. “ही केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी माणसे आहेत,” असा शाब्दिक हल्ला एकनाथ शिंदेंनी केला. तसेच जोडे पुसणारे तुमच्यापेक्षा जास्त प्रामाणिक असल्याचीही टीका केली. एकनाथ शिंदेंनी गुरुवारी (२७ एप्रिल) ट्वीट करत भूमिका मांडली.
एकनाथ शिंदे म्हणाले, “काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की, माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात.”
“जोडे पुसणारे तुमच्यापेक्षा जास्त प्रामाणिक”
“जोडे पुसणारे गरीब असतील, पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही. त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते,” अशी टीका एकनाथ शिंदे यांनी केली.
हेही वाचा : “…म्हणून माझी जिरवू नका”, ‘त्या’ निवडणुकीबाबत अजित पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा
“ही हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी माणसे”
“वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे. ही केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की,” असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला.