मुंबई : संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी डागलेल्या तोफेमुळे भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर आपापसात मतभेद नकोत आणि परस्परांवर टीकाटिप्पणी टाळावी, असा सल्ला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत मंत्र्यांना बुधवारी दिला.

कायक्र्रम पत्रिकेवरील सर्व विषय संपल्यावर साऱ्या अधिकाऱ्यांना बाहेर काढून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांशी संवाद साधला. संजय राठोड यांच्या समावेशावरून चित्रा वाघ यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया शिंदे गटाला फारशी रुचलेली नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वाघ यांच्या या प्रतिक्रियेबद्दल शिंदे गटाच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यावर मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी आपापसात मतभेद नसावेत व जनतेसमोर ते येऊ नयेत, असा सल्ला मंत्र्यांना दिला. सर्वानी एकत्रितपणे सामोरे गेले पाहिजे. तसेच सध्या १८ मंत्री असल्याने प्रत्येकाने दोन जिल्ह्यांकडे लक्ष द्यावे, अशी सूचना करण्यात आली.  विरोधी पक्ष टीका करणार हे लक्षात घेऊन या टिकेला प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत राहा, असा सल्ला फडणवीस यांनी दिला. चित्रा वाघ यांनी चुकीच्या माहितीच्या आधारे आपल्यावर आरोप केले आहेत. त्यांना मी सर्व कागदपत्रे बघण्यासाठी पाठविणार असल्याचे मंत्री संजय राठोड़ यांनी सांगितले. या संदर्भात पोलिसांनी आपल्याला यापूर्वीच निर्दोषत्व बहाल केल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.  सर्वानी जबाबदारीने वागावे आणि बेजबाबदार वक्तव्ये करू नयेत, असा सल्लाही मंत्र्यांना देण्यात आला.