मुंबई : सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जावर कालमर्यादेत निपटारा व्हावा, लोकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी राज्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’  राबविण्याचा निर्णय सोमवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

त्यानुसार अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचे वाटप करण्यासोबतच लोकांची प्रलंबित कामे या कालावधीत मार्गी लावण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनास दिले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबरला वाढदिवस असून त्यांना वाढदिवस साजरा केलेला आवडत नाही. मात्र पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून १७ सप्टेंबरपासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा राबविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर सांगितले. मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून संवाद साधत या पंधरवडय़ामध्ये नागरिकांचे प्रलंबित अर्ज निकाली काढण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्याचे आदेश दिले. तर या पंधरवडय़ाच्या अंमलबजावणीचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी  सांगितले.

या पंधरवडय़ात सामान्य नागरिकांचे प्रलंबित अर्ज, तक्रारी यांचा निपटारा करण्यात येणार आहे. या सेवा पंधरवडय़ात आपले सरकार पोर्टलवरील ३९२ सेवा, महावितरण पोर्टलवरील २४ सेवा, डी.बी.टी पोर्टलवरील ४६ सेवा, नागरी सेवा केंद्रातील सर्व सेवा, विभागांच्या स्वत:च्या वेबपोर्टलवर १० सप्टेंबपर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींचा निपटारा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच मदत आणि पुनर्वसन, कृषी, महसूल, अन्न व नागरीपुरवठा, ग्राम विकास, नगर विकास, आरोग्य, पाणीपुरवठा, महावितरण, आदिवासी विकास, सामाजिक न्याय या विभागातील सेवांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे.