सत्तापालट झाल्यानंतरचं पहिलेच अधिवेशन हे वादळी ठरणार याचे संकेत पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पहायला मिळाले. ‘आले रे आले ५० खोके. ५० खोके, एकदम ओके’. ‘ईडी सरकार हाय हाय’ च्या घोषणा देत विरोधकांनी राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं. विरोधकांनी विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत शिंदे गटाला लक्ष्य केलं. विरोधी पक्षनेते अजित पवार व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह नाना पटोले, बाळासाहेब थोरात, आदित्य ठाकरे आदींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात फलक झळकावत घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे या घोषणाबाजीच्या गोंधळामध्ये काही क्षण आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेही आमने-सामने आल्याचं पहायला मिळालं.

नक्की वाचा >> CM शिंदेंना पाहताच विरोधांकडून ‘५० खोके, एकदम ओके’ची घोषणाबाजी; शिंदेंसमोर चालणारा आमदार वैतागून म्हणाला, “तुम्हाला…”

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी करतानाच विरोधकांनी प्रामुख्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केले. मुख्यमंत्री शिंदे सव्वा दहाच्या सुमारास विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले. त्यानंतर विधानभवनाच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सहकाऱ्यांसोबत अभिवादन केलं. यानंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यासहीत समर्थक आमदार सभागृहात येत असतानाच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरच जोरदार घोषणाबाजी केली. ‘आले रे आले पन्नास खोके आले..खोके घेऊन ओके झालेल्या सरकारचा धिक्कार असो.’. ‘आले रे आले गद्दार आले’. ‘ईडी सरकार हाय हाय,.स्थगिती सरकार हाय. हाय’. अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधिमंडळ परिसर दणाणून सोडला.

दरम्यान एकीकडे मुख्यमंत्री शिंदे हे विधानभवनामध्ये प्रवेश करत असताना त्यांच्यापासून हातभर अंतरावर युवासेनेचे नेते आदित्य ठाकरे उभे होते. शिंदे हे ५० खोकेवाल्या घोषणा ऐकून स्मितहास्य करत पायऱ्यांवरुन चालत असताना एका क्षणाला शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले. मात्र विरोधी पक्षाचे आमदार पायऱ्यांवर आंदोलन करत असल्याने शिंदे आणि समर्थक आमदारांनी एका बाजूने चालत विधानसभेत प्रवेश केला. शिंदे हे पायऱ्यांवरुन वर जाताना बाजूलाच पायऱ्यांवर आदित्य ठाकरे हे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. शिंदेंना पाहून विरोधी पक्षातील आमदार मोठमोठ्याने  ५० खोके, एकदम ओके’च्या घोषणा देत होते. त्यामुळेच शिंदे हे आदित्य यांच्या बाजूने हसतच वर विधानभवनातील सभागृहाकडे निघाले.

मुख्यमंत्री शिंदे आणि आदित्य ठाकरे हे अशाप्रकारे सत्तापालट झाल्यानंतर प्रत्यक्षात पहिल्यांदा समोरासमोर आल्याचं पहायला मिळालं. यावेळेस या दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे पाहीले सुद्धा नाही. पण आदित्य घोषणाबाजी करणाऱ्या आमदारांच्या घोळक्यात उभे असताना ज्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जात आहे ते शिंदे बाजूने चालत गेल्याचे दृश्य आणि घटनाक्रम चांगलाच चर्चेचा विषय ठरला.