उद्योजकांना त्रास देणाऱ्यांवर व अडवणूक करणाऱ्यांवर पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी दिले. उद्योगवाढीसाठी पोलिसांची भूमिका महत्वाची असून एमआयडीसी क्षेत्रात कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. एमआयडीसी क्षेत्रातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘वर्षां’ निवासस्थानी आयोजित केलेल्या बैठकीस उद्योगमंत्री सुभाष देसाई, गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, कामगार राज्यमंत्री विजय देशमुख, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव के.पी. बक्षी, उद्योग  विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, पोलिस महासंचालक संजीव दयाळ, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी उपस्थित होते. काही स्थानिक घटकांकडून उद्योग उभारणीमध्ये अडथळे उभारले जातात. पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेऊन कारवाई करणे आवश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.