scorecardresearch

“तुमचा सकाळचा प्रयोग यशस्वी झाला असता तर अनिल देशमुख…”; मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

हर्षवर्धन पाटील यांना झोप लागत नव्हती. मग झोपेचं औषध घेतलं. तिकडे जाऊन झोपायला लागले, असेही मुख्यमंत्री म्हणाले

CM Uddhav Thackeray criticizes Devendra Fadnavis

तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांवर जोरदार टीका केली. आम्ही जर का तुमच्यासोबत असतो तर आज तुम्ही आमच्या कुटुंबाची जी काही बदनामी करत आहात, ती केली असती का, असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

हर्षवर्धन पाटील तिकडे जाऊन झोपायला लागले

“आता जे काही चाललं आहे की, एकेक गोष्टी बोलून मग केल्या जातात. आता मध्ये हर्षवर्धन पाटील जे आधी तुमच्याकडे होते. त्यांना झोप लागत नव्हती. मग झोपेचं औषध घेतलं. तिकडे जाऊन झोपायला लागले. हा अनुभव काही त्यांनी कानात नाही सांगितलाय तर एका सभेत सांगितला आहे. तर असं काय तुमच्याकडे झोपेचं औषध आहे मला कळत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

“आम्ही सगळे इथे बसलेले भ्रष्टाचारी आणि दाऊदची माणसं आहोत. पण तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर नवाब मलिक आणि अनिल देशमुख तुमच्या मांडीला मांडी लावून बसले असते की नाही,” असा टोला मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीसांनी लगावला.

केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन एकमेकांच्या कुंटुंबियांच्या त्रास दिला जातोय

“आता एक अत्यंत विकृत पद्धत सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन एकमेकांच्या कुंटुंबियांच्या त्रास दिला जातोय. आम्ही जर का तुमच्यासोबत असतो तर तुम्ही आमच्या कुटुंबियांना बदनाम केलं असतं का? ही अत्यंत निच आणि निंदनीय पद्धत, विकृत अशी गोष्ट सुरू आहे. जर मर्द असाल तर मर्दासारखं अंगावर या, मग बघून घेतो. तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करुन, संस्थाचा दुरुपयोग करुन या गोष्टी केल्या जातायंत. शिखंडीच्या मागे राहून धाडी टाकायच्या याला मर्दपणा म्हणत नाहीत,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

“मागे नितीन गडकरी बोलले होते की आमच्याकडे वाल्याचा वाल्मिकी होतो. मग ईडीचं काम मनी लॉन्डिरग असतं, तुमच्या ह्युमन लॉन्डिरगचं काम आहे. बरबटलेला माणूस घ्यायचा. त्याला म्हैसूर सॅण्डल सोप आणि छान अत्तर लावून बघा कसा सुंदर झाला, हे ह्यमुन लॉन्डिरग तुम्ही सुरू केलं का?”, असा टोला उद्धव ठाकरेंनी भाजपाला लगावला. 

लोकांना आपण काय देणार आहोत?

“हे जे होतंय ते कुणी बघत नाही, असं समजू नका. पोरांचे चाळे,थेर बघू न शकणारा धृतराष्ट्र होता, पण धृतराष्ट्र नाही. हा छत्रपतींचा लढणारा महाराष्ट्र आहे. अशा वाटेला जाऊ नका. यातून कुणाचंच भलं होणार नाही. यातून काहीच होणार नाही. लोकांना आपण काय देणार आहोत? अनेकांची इथे येण्याची स्वप्न असतात. आपल्याला संधी मिळाली आहे. संधीचं सोनं करायचं की, माती हे ठरवायचं. काही सूचना असतील, तर सांगा. नवीन कल्पना असतील, तर सांगा. गुन्हेगार असेल, तर सांगा. उगाच बदनामी करू नका,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

कुटुंबांची बदनामी कशाला करता

“तुम्हाला सत्ता हवी ना, म्हणून तुम्ही हे ताणतणाव. कुटुंबियांना तणावात ठेवायचं. मग याला अटक करायचं, मग त्याला बेलच मिळू द्यायचा नाही. हे चाळे चाललेत ना. चला मी तुम्हाला या सगळ्यांच्या समोर सांगतो, तुम्हाला सत्ता हवीये ना. उगाच तुम्ही काही गोष्टी करू नका. पेन ड्राईव्ह गोळा करायला जाऊ नका. पेन ड्राईव्हचा खप उगाच वाढतो. ज्यांना हवा त्यांना मिळत नाही. त्यांचे त्यांना राहू द्या. मी म्हणतो मी तुमच्यासोबत येतो. मी येतो तुमच्यासोबत. सत्तेसाठी नाही, तर तुम्ही आता जे चाळे केले आहेत. माझ्या कुटुंबियांची बदनामी करायची. उगाच त्यांच्या मालमत्तांवर टाच. टाचेला मी घाबरत नाही. शाळेत मला छत्रपतींची कविता होती. खबरदार जर टाच मारूनी उडवेन चिंधड्या राई-राई एवढ्या. त्यामुळे टाचेला नाही घाबरत. मी तुमच्याबरोबर येतो. टाका मला तुरुंगात. माझ्यावरतीच यायचं ना… या ना मग, कुटुंबांची बदनामी कशाला करता. आम्ही कधी तुमच्या कुटुंबियांची बदनामी केलीये. तुमच्या कुटुंबियांच्या भानगडी असतील, आहेत असं म्हणणार नाही. आम्ही कधी काढण्याचा प्रयत्न केलाय कधी?”, असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी भाजपाला केला.

मी तुमच्याबरोबर येतो मला तुम्ही तुरुंगात टाका

“मी तुमच्याबरोबर येतो. तुम्ही तुरुंगात टाका, मग तुमच्या फुसरतीने आरोप गोळा करा. तेही करू नका. कारण त्याची गरज नाही. खुलासे करून उपयोग नाही. कुठे ऐकलंच जात नाहीये. काहीही सादर केलं की, नाकारल्या जातात. मग याचं शेपूट त्याला, त्याचं शेपूट याला. पुरावे गोळा केले जातात. न्यायालयासमोर नेले जातात. मग न्यायालय काय करणार, समोर आहे त्याप्रमाणे दे शिक्षा. तुमचा इतकाच जीव जळत असेल, तर टाका मला तुरुंगात. मी तयार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या. तुरुंग कोणता? ऑर्थर रोड, तिहार नाही. जसं बाबरी मशिदीच्या खाली रामजन्मभूमी होती. त्याप्रमाणे कुठल्या जन्मभूमीचा शोध तुम्हाला लागला असेल, त्या तुरुंगात मला टाका”, असं जाहीर आव्हान ठाकरेंनी फडणवीसांना दिलं.

“मी कृष्णाचा अवतार नाही. मी कदाचित देवकीच्या पहिल्या सात मुलांपैकी असेल, पण त्या तुरुंगात मी कृष्णजन्माची वाट बघेन. मी जसं सांगतो की, कृष्ण नाहीये, तसं तुम्हाला सांगता आलं पाहिजे की, कसं नाही आहात. माझी तयारी आहे,” असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मी कडवट हिंदुत्ववादी आहे आणि राहणारच!

“माझ्या कुटुंबियांनी काय पाप केली असतील. बाळासाहेबांना काय उत्तर देणार. मग मी तुम्हाला विचारतोय बाळासाहेबांनी ज्या तुमच्या नेत्यांना वाचवलं, ते तरी गेल्यानंतर काय उत्तर देणार? ज्यावेळेला त्यांच्यासोबत कुणी नव्हतं. सगळेजण ते नको म्हणत होते. तेव्हा बाळासाहेब एकटे त्यांच्या मागे उभे राहिले. काय उत्तर देणार. २०१४ मध्ये युती तोडली,  ती तुम्ही तोडली. तेव्हाही मी हिंदूच होतो. आजही तुम्हाला असं वाटतं की हिंदुत्वापासून फारकत घेतली, तर २०१४ साली हिंदूच होतो. आजही आहे,” असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

माझ्या सर्व शिवसैनिकांची जबाबदारी मी घेतो

“तुरुंगातून टाकणार असाल, तर सर्व जबाबदारी मी घेतो. माझ्या सर्व शिवसैनिकांची जबाबदारी मी घेतो. मला टाका तुरुंगात. १९९२-९३ साली जेव्हा सगळ्यांनी शेपट्या घातल्या होत्या, तेव्हा जिवावर उदार होऊन मुंबई वाचवली, त्या शिवसैनिकांना छळू नका. आम्ही ऐकतोय. हे यंत्रणांचे दलाल आहेत की, प्रवक्ते. हा तुरुंगात जाणार. अनिल देशमुख तुरूंगात जाणार, नवाब मलिक तुरुंगात जाणार. अनिल परब तुरुंगात जाणार. उद्या किशोरी पेडणेकरांना तुरुंगात टाकणार, हे काय आहे?”, असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.

“इंदिरा गांधींनी निदान आणीबाणी घोषित केली होती. अघोषित आणीबाणी इतक्या डरपोक त्या नव्हत्या. चांगली वाईट, पण त्यांनी घोषणा केली आणीबाणीची. ते धाडस त्यांनी दाखवलं. १९९२-९३ साली पोलिसांनी आणि लष्कराने हिंदूंना वाचवण्यासाठी गेलेल्या अनिल परबांना गुरासारखं मारलेलं आहे. त्यांचं तुम्ही बांधकाम पाडता आहात. जे पाडायचं ते पाडा. पण सगळ्यांची पाडा, कुणालाही पदराखाली घ्यायचं नाही”, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी अप्रत्यक्षपणे राणेंवरही निशाणा साधला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cm uddhav thackeray criticizes devendra fadnavis abn

ताज्या बातम्या