मुंबई : मुंबईला झोपडपट्टी आणि खड्डेमुक्त बनवण्याचे लक्ष्य पालिकेपुढे ठेवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पालिकेत चार तास आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्री झाल्यानंतर ठाकरे प्रथमच पालिकेत आले होते.

मुंबईतील रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी अशा विविध विभागांतील आगामी प्रकल्पांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. मंत्री जयंत पाटील, पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी   बैठकीला उपस्थित होते. गुरुवारी दुपारी ३ वाजल्यापासून संध्याकाळी ७ वाजेपर्यंत सलग चार तास ही बैठक सुरू होती.

रस्त्यांच्या कडेने फोफावत चाललेल्या झोपडय़ांना आळा घालण्यासाठी आणि मुंबई झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी काय करता येईल यावर या बैठकीत चर्चा झाली. यासाठी झोपडय़ा अधिकृत करण्याची कालमर्यादा आता थांबवली पाहिजे असा मुद्दा अधिकाऱ्यांनी मांडला. झोपडपट्टय़ांच्या पुनर्विकासासाठी परवडणारी घरे आणि प्रकल्पबाधितांसाठी मोठय़ा प्रमाणावर सदनिका बांधण्याबाबत यावेळी आढावा घेण्यात आला.

‘व्हिजन २०३०’ अंतर्गत पाणीपुरवठा वाढवण्यासाठीच्या योजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. गारगाई पिंजाळ धरण प्रकल्प वेळेत पूर्ण केल्यास ४४० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा दरदिवशी वाढू शकतो. पाण्याची वाढती गरज पूर्ण करण्यासाठी ‘व्हिजन २०३०’ हे लक्ष्य ठेवण्यात आल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत सांगितले.

शिष्टाचार मोडल्याची चर्चा : मुंबई महापालिकेवर शिवसेनेची २२ वर्षे सत्ता असून पक्षप्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत अनेकदा आयुक्तांच्या दालनात आढावा बैठक घेतली होती. शिष्टाचारानुसार मुख्यमंत्र्यांनी किंवा महापौरांनी आयुक्तांना बोलावून घ्यायचे असते. हा शिष्टाचार मोडत गुरुवारी ठाकरे स्वत: आयुक्तांच्या दालनात चार तास थांबले होते. महापौर किशोरी पेडणेकर यांनाही आयुक्तांच्या दालनात जावे लागले. त्यामुळे ठाकरे अद्याप पक्षप्रमुखांच्या भूमिकेतून बाहेर पडले नसल्याचीच चर्चा पालिका वर्तुळात रंगली होती.

डॉ. आंबेडकरांचे स्मारक प्रेरणादायी ठरेल – ठाकरे

मुंबई : दादर येथील इंदू मिलच्या जागेवर राज्य शासनाच्या वतीने उभारण्यात येणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक जगाला अन्यायाविरुद्ध तसेच विषमतेविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देणारे ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी व्यक्त केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त   दिलेल्या संदेशात मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेबांनी विषमतेविरुद्ध लढा पुकारला. त्यांचे जीवन धगधगते अग्निकुंड होते. माणूस म्हणून जगण्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी लढा उभारला. इंदू मिलच्या जागेवरील नियोजित स्मारक  आगळेवेगळे स्मारक ठरेल. दरम्यान, मुख्यमंत्री  शुक्रवारी सकाळी ७.४५ला चैत्यभूमीवर जाऊन डॉ.  आंबेडकरांना अभिवादन करतील, अशी माहिती देण्यात आली.