हिंदुत्वाची मक्तेदारी काही भाजपकडे नाही. देशातील सद्य:स्थिती पाहता लोकांना आता पर्याय हवा असल्याचे दिसते. जनता पर्याय शोधू लागते तेव्हा तो निर्माणही होतो, असे सूचक विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी ‘लोकसत्ता’च्या वर्धापन दिन कार्यक्रमात केले.

‘लोकसत्ता’च्या ७३ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव ठाकरे बोलत होते. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. करोनाकाळातील आव्हाने, प्रशासकीय यंत्रणा हाताळणे, तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार, भाजपकडून सतत सरकार पडण्याबाबत होणारी विधाने अशा विविध विषयांवर मुख्यमंत्री ठाकरे यांनी मनमोकळे भाष्य केले. ‘लोकसत्ता वर्षवेध’चे प्रकाशन या वेळी ठाकरे यांच्या हस्ते झाले. एक्स्प्रेस समूहाचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांचे स्वागत केले. एक्स्प्रेस समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वर्गिस यांनी भेटवस्तू देऊन ठाकरे यांचे आभार मानले.

‘‘मी अयोध्येला गेलो तेव्हाच स्पष्ट केले होते, की भाजपपासून दूर गेलो आहे, हिंदुत्वापासून नाही. हिंदुत्वाचे ‘पेटंट’ भाजपने घेतलेले नाही; पण शिवसेना महाराष्ट्रापुरती राहिल्याने दरम्यानच्या काळात हिंदुत्वाचा पर्याय उभा करण्याबाबत देशात एक पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्याची गरज आहे. एखादा पक्ष ती एकटा भरून काढेल किंवा काही जण एकत्र येऊन भरून काढतील; पण आता पर्याय हवा असे लोकांना वाटू लागले असून, लोकांना वाटते तेव्हा पर्याय उभा राहतो,’’ असे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आगामी काळात देशात नवी समीकरणे उदयाला येऊ शकतात, असे सूचित केले.

बाबरी मशीद पडल्यावर इतरांनी हात झटकले; पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ती मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे, असे विधान केले. त्या एका वाक्याने शिवसेनेच्या हिंदुत्वाबद्दल देशात लोकांना-नेत्यांना आकर्षण वाटू लागले; पण आम्ही त्या वेळी देशात मित्रपक्ष भाजप हिंदुत्वाचा झेंडा घेत असल्याने हिंदुत्ववादी पक्ष म्हणून महाराष्ट्रातच राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे इतर ठिकाणी अनेक चांगले कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले. आता इतर राज्यांत शिवसेनेचे हिंदुत्व आवडत असेल तर जरूर काम करा, अशी भूमिका आम्ही घेतली आहे, असे सांगत देशात इतर राज्यांत शिवसेनेच्या विस्ताराचा मनोदय मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला.

पुढच्या वर्षी मी मुख्यमंत्री म्हणून ‘लोकसत्ता’च्या कार्यक्रमाला येणार नाही, असे काही जणांना वाटत होते; पण मी आलो आणि पाच वर्षे येणारच, असे उद्धव ठाकरे यांनी भाजपला सुनावले. तसेच आधी सरकार पडणार म्हणत होते, आता फोडणार म्हणतात. महाविकास आघाडी सरकार फुटायला काही गंमत आहे का? हिंमत असेल तर सरकार फोडून दाखवा, असे आव्हान मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिले. तसेच भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी झालेल्या चर्चेबद्दल, ‘‘त्या झाडाला काही फळ येईल, असे वाटत नाही. आता त्यांनी निदान मुळावर तरी कु ऱ्हाड मारू नये,’’ असा चिमटाही ठाकरे यांना काढला.

मनात आले म्हणून आरेमधील मेट्रो कारशेड प्रकल्प कांजूरला हलवलेला नाही. आरेचे जंगल वाचेल आणि कांजूरमधील कारशेडमुळे तीन मेट्रो मार्गासाठी एका जागी व्यवस्था तयार होईल आणि मेट्रोचे जाळे बदलापूपर्यंत विस्तारण्यास मदत होईल. सरकार म्हणून के वळ घाईघाईत कामे उरकायची नसतात. दूरदृष्टी ठेवून दीर्घकालीन नियोजन करायचे असते, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला. ‘प्रधानसेवक’ म्हणवून घेणाऱ्या पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील जमीन राज्याला विकासकामांसाठी मिळावी यासाठी काम करून लोकांची सेवा करावी, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्र हा भारताचा आधार

देशात ‘जीएसटी’च्या करप्रणालीत सुधारणा करण्याची गरज आहे. सध्या राज्याच्या हक्काचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे जीएसटी करप्रणालीत सुधारणा होईपर्यंत ती स्थगित करण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा व्यक्त के ली. तसेच यासाठी देशातील इतर राज्यांना एकत्र करण्यात पुढाकार घेण्याची महाराष्ट्राची तयारी आहे. महाराष्ट्र हा भारताचा आधार आहे, असे नमूद करत गरज भासते तेव्हा महाराष्ट्र हिंमत दाखवतो, असेही ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणाले..

० करोनाकाळात लोकांवर बंधन घालावी लागली याचे वाईट वाटते.

० करोनाचा ब्रिटनमध्ये आढळलेला नवा विषाणू वेगाने पसरतो. त्यामुळे आपल्याला अजूनही काळजी घेतली पाहिजे. सिनेमागृहे सुरू करा, वगैरे असे के ंद्राने काहीही वेडेवाकडे सांगितले तरी महाराष्ट्रातील लोकांना सुरक्षित ठेवण्यासाठी मी तसे काही करणार नाही. लोकांनी खलनायक ठरवले तरी चालेल. पण राज्यातील लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे.

० मुंबईत लोकलसेवा सुरू करताना गर्दी विभागली जावी यासाठी खासगी क्षेत्राने आपल्या कार्यालयाच्या वेळा बदलाव्यात.

० मागील भाजपचे सरकार पारदर्शकतेचा दावा करायचे. त्यांनी लावलेली ३० कोटी झाडे पारदर्शक असतील म्हणूनच लोकांना दिसत नाहीत.

० ठाकरे चौकटीत अडकत नाहीत, याचा अर्थ जबाबदारीला-आव्हान स्वीकारायला घाबरतात असे नव्हे.

० करोनाच्या सुरुवातीच्या काळात लोकांशी संवाद साधल्यावर आमच्या घरातले कोणी बोलत आहे असे वाटले, ही प्रतिक्रिया आली ती आयुष्यातील सर्वात मोठी कमाई.

० राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी १ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचे सामंजस्य करार के ले असून, ते प्रत्यक्षात येतील यावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

 ‘मी पुन्हा-पुन्हा येईन’

महाविकास आघाडी सरकार पडणार, असे दावे काही जण करीत होते. पण त्यांचे हे दावे फोल ठरले. तुम्ही पुन्हा पुन्हा कार्यक्र माला बोलवा, मी पुन्हा-पुन्हा येईन, पूर्ण ५ वर्षे येईन, अशी खोचक टोलेबाजीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली.

‘लोकसत्ता वर्षवेध’ आजपासून उपलब्ध..

करोनाकाळातील जगण्याच्या नोंदी, देशाच्या राजकीय वर्तुळातील घटनांपासून जगाच्या राजकारणात झालेल्या बदलांची दखल; समाजकारण, क्रीडा, मनोरंजन या क्षेत्रांतील घडामोडी यांसह २०२० या वर्षांचा संपूर्ण आढावा असलेला ‘लोकसत्ता वर्षवेध’ हा  आजपासून राज्यात सर्वत्र उपलब्ध झाला आहे.

भाजपपासून दूर गेलो आहे, हिंदुत्वापासून नाही, हे मी अयोध्येला गेलो तेव्हाच स्पष्ट के ले होते. हिंदुत्वाचे ‘पेटंट’ भाजपने घेतलेले नाही; पण, दरम्यानच्या काळात हिंदुत्ववादी पक्ष म्हणून आम्ही महाराष्ट्रातच राहण्याचा निर्णय घेतल्याने हिंदुत्वाचा पर्याय उभा करण्याबाबत देशात एक पोकळी निर्माण झाली. ती आता भरून काढण्याची गरज आहे.

– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

मुख्य प्रायोजक : वर्ल्ड वेब सोल्युशन्स

सहप्रायोजक : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, सिडको,

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, रुणवाल ग्रुप,

पुनीत बालन स्टुडिओज

बँकिंग पार्टनर : टीजेएसबी सहकारी बँक लि.

पॉवर्ड बाय पार्टनर : पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट