धक्कादायक : मुंबईहून प्रयागराजकडे जाणाऱ्या ट्रेनमधून शवपेटीतील मृतदेह गायब

सोमवारी रात्री उशिरा ट्रेन प्रयागराज स्टेशनवर पोहोचली तेव्हा गार्डच्या डब्यामध्ये असलेल्या शवपेटीत मृतदेह सापडला नाही

Coffin Body missing from coach of Mumbai UP train
(प्रातिनिधीक छायाचित्र)

प्रयागराज येथे नातेवाईकाचा मृतदेह रेल्वेने घेऊन जाणाऱ्या मुंबईतील एका कुटुंबाला सोमवारी धक्का बसला. मुंबई-वाराणसी स्पेशल एक्स्प्रेसच्या गार्डच्या डब्यामध्ये ठेवलेल्या शवपेटीतून मृतदेह गायब झाल्याचे समजल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी प्रयागराज स्टेशनवर गोंधळ घातला. उत्तर प्रदेशातील प्रतापगढ येथील बरहुपूर गावातील एका महिलेचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला. या महिलेचा मृतदेह शवपेटीत ठेवून त्यांचे कुटुंबीय ट्रेनमधून उत्तर प्रदेश येथे जात होते. वाटेत मृतदेह शवपेटीतून गायब झाला. सोमवारी रात्री उशिरा ट्रेन प्रयागराज स्टेशनवर पोहोचली तेव्हा गार्डच्या डब्यामध्ये असलेल्या शवपेटीत मृतदेह सापडला नाही. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर मृतदेहाचा शोध सुरू करण्यात आला.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, प्रतापगड पट्टी तहसील परिसरातील बरहुपूर येथील रहिवासी वहाब शेख यांच्या ५६ वर्षीय पत्नी सरवारी बेगम गंभीर आजाराने त्रस्त होत्या. त्यांच्यावर मुंबईतील टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शनिवारी त्यांचा मृत्यू झाला. सरवरी यांची शेवटची इच्छा होती की त्यांना त्यांच्या गावाजवळ दफन करावे. सर्फराज, गुफ्रान, गल्फम आणि फरिन यांनी कुर्ला-वाराणसी फेस्टिवल स्पेशल ट्रेनने त्यांच्या आईचे पार्थिव नेण्यासाठी आरक्षण केले. मृतदेह शवपेटीत ठेवून तो पार्सलच्या डब्यात ठेवण्यात आला. कुटुंबिय ट्रेनसह दुसऱ्या डब्यातून प्रवास करत होते. सोमवारी रात्री अकरा वाजता ट्रेन प्रयागराज स्थानकावर पोहोचली तेव्हा ते गार्ड डब्यातून मृतदेह उतरवण्यासाठी गेले. बराच शोध घेऊनही त्यांना मृतदेह सापडला नाही.

१२ तासांच्या शोधानंतर, मृतदेह २०२ किमी अंतरावर मध्य प्रदेशातील मैहर स्टेशनजवळच्या रुळांवर सापडला. मंगळवारी संध्याकाळी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर तो प्रयागराज येथे आणण्यात आला आहे. दरम्यान, मृतदेह बाहेर कसा आला हा प्रश्न कायम आहेत. रेल्वे सुरक्षा बलानुसार शवपेटी एका रिकाम्या डब्यात उलटली आणि मृतदेह खाली कोसळला. तर कुटुंबियांना रेल्वे प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे.

वाराणसीला जाणाऱ्या ट्रेनमधील शवपेटीतून एका महिलेचा मृतदेह बेपत्ता झाला आणि नंतर २०२ किमी दूर सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सरवारी शेख यांचा मुलगा गुलफाम शेख भिवंडीमध्ये काम करतात. सरवारी शेख यांनी जुलैमध्ये मुंबईत आणले होते. त्या धारावीतील नातेवाईकाच्या घरी राहत होत्या आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होत्या. रविवारी सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या मूळ ठिकाणी नेण्याचा निर्णय घेतला. रेल्वेने मृतदेह नेण्यासाठी महापालिकेकडे मृत्यूच्या प्रमाणपत्रासह सर्व कागदपत्रे कुटुंबाने सादर केली.

सोमवारी रात्री ९ वाजता, जेव्हा कुटुंबिय प्रयागराज येथे उतरले आणि ‘गार्ड’ डब्यातून मृतदेह घेण्यासाठी गेले. त्यांना शवपेटी हलकी आढळल्याने त्यांनी ती उघडून पाहिली. त्यांनी ताबडतोब रेल्वे पोलिसांना बेपत्ता मृतदेहाबाबत माहिती दिली. जीआरपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आणि मुख्य नियंत्रण कक्षाला तसेच सर्व प्रमुख रेल्वे स्थानकांना जिथे ट्रेन थांबली होती तिथे ही माहिती दिली.

त्यानंतर तक्रार दाखल करण्यात आली, आणि जवळपास २५ रेल्वे स्थानके आणि मार्गावरील रेल्वे ट्रॅकची तपासणी करण्यात आली. पोलिसांना मृतदेह २०२ किमी दूर मैहर स्टेशनजवळ रुळांवर पडलेला आढळला. आरपीएफच्या पथकाने मंगळवारी दुपारी मैहर येथे मृतदेह ताब्यात घेतला आणि रात्री उशिरा प्रयागराजमधील कुटुंबीयांच्या ताब्यात दिला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Coffin body missing from coach of mumbai up train abn