कुलाबा ते सीप्झ दरम्यानच्या ‘मेट्रो-३’ प्रकल्पासाठी आरे कॉलनीत उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित कारशेडला होणारा विरोध तसेच प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे या प्रकल्पाचे काय होणार अशी शंका व्यक्त केली जात असली तरी, ‘हा प्रकल्प रद्द करण्याचा सरकारचा कोणताही विचार नसून कारशेडबाबतही सर्वमान्य तोडगा निघेल,’ अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी दिली.
मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीत मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड करण्यात येणार आहे. तसेच या प्रकल्पात दादर, गिरगाव येथील घरेही जाणार असल्यामुळे या प्रकल्पास विरोध होत आहे. दादर येथील रहिवाशांना घरे खाली करण्याबाबत बजावण्यात आलेल्या नोटिशीवरून उद्योगमंत्री सुभाष देसाई, आमदार सदा सरवणकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, दादरमधील रहिवाशी वा शिवसेनेचा प्रकल्पास विरोध नाही. पुनर्वसन तेथेच व्हावे अशी त्याची मागणी आहे. त्यानुसार रहिवाशांचे पुनर्वसन तेथेच केले जाईल. तसेच रहिवाशांनी सुचविलेल्या पर्यायी जागेचाही सव्‍‌र्हे केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. मात्र कोणी काहीही म्हणत असले तरी प्रकल्प रद्द होणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. कारडेपोसाठी पर्यायी जागेचा शोध घेण्यासाठी गठित समितीचा अहवाल लवकरच येईल. त्यातून सर्वमान्य तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
बांधकामांना दिलासा?
विमानतळाच्या २० किमी परिसरातील बांधकामांच्या उंचीवर केंद्राचे र्निबध आहेत. त्यामुळे वडाळा, वांद्रे- कुर्ला संकुलातील शासनाच्या चटईक्षेत्र निर्देशांकाची विक्री होत नसल्यामुळे सरकारचेच नुकसान होत आहे. शिवाय बांधकामांवरही र्निबध आहेत. त्यामुळे हे र्निबध शिथिल करण्याची विनंती नागरी हवाई वाहतूकमंत्र्याना करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.