scorecardresearch

मुंबईत आणखी तीन दिवस थंडीचा मुक्काम; उत्तरेकडील थंडीच्या लाटेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी 

मुंबईसह संपूर्ण कोकण, उत्तर महाराष्ट्र, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यांच्या काही भागांत १८ जानेवारीपर्यंत थंडी ठाण मांडून असेल.

मुंबईत आणखी तीन दिवस थंडीचा मुक्काम; उत्तरेकडील थंडीच्या लाटेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी 
संपूर्ण राज्याच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशाने घसरण होऊन थंडी वाढली आहे. प्रातिनिधिक फोटो- लोकसत्ता

मुंबई/पुणे : हिमालयीन प्रदेशात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे उत्तरेकडील राज्यांत थंडीची लाट पुन्हा तीव्र झाल्यामुळे मुंबई, कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राला हुडहुडी भरली आहे. पुढील दोन-तीन दिवसांत गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उत्तरेकडून येणाऱ्या शीत लहरीमुळे संपूर्ण राज्याच्या किमान तापमानात सरासरीपेक्षा दोन ते तीन अंशाने घसरण होऊन थंडी वाढली आहे. मुंबईत रविवारी यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची (१३.९ अंश सेल्सिअस) नोंद करण्यात आली. कमाल तापमानातही घसरण झाल्यामुळे मुंबईत रविवारी दिवसभर गारठा होता. वाढत्या थंडीबरोबर मुंबईतील हवेचा दर्जाही खालावला. अनेक भागांतील हवेची स्थिती अतिवाईट या श्रेणीत होती.

गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कमाल आणि किमान तापमानात घट होत होती. शुक्रवार रात्रीपासून मुंबईचे किमान तापमान १५ अंशाखाली आले तर, रविवारी ते १३ अंशापर्यंत घसरले. देशाच्या उत्तरेकडील भागात हिमवर्षांव वाढल्याने उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. तर, उत्तरेकडील शीत वारे दक्षिणेकडे वाहत आहेत. त्यामुळे मुंबईसह राज्यही गारठले आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह विदर्भातील सर्वच भागात किमान तापमान खाली घसरले आहे.

आणखी तीन दिवस गारठय़ाचे..

मुंबईसह संपूर्ण कोकण, उत्तर महाराष्ट्र, अहमदनगर, औरंगाबाद या जिल्ह्यांच्या काही भागांत १८ जानेवारीपर्यंत थंडी ठाण मांडून असेल. त्यामुळे  मुंबईतला गारठा आणखी दोन दिवस असेल. त्यानंतर मात्र किमान तापमानात वाढ होईल, असा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.

हवाही अतिवाईट

मुंबईला हुडहुडी भरली असताना हवा प्रदूषणातही वाढ झाली आहे. त्यामुळे रविवारी मुंबईला धुरक्याने वेढले होते. हवेचा दर्जा ‘वाईट’ या श्रेणीत नोंदवण्यात आला. वाऱ्यांचा वेग मंदावल्याने दक्षिण आणि मध्य मुंबईतील हवेची श्रेणी ‘वाईट’ स्थितीत आहे. वांद्रे-कुर्ला संकुल, चेंबूर, अंधेरी येथील हवा मात्र ‘अत्यंत वाईट’ आहे, अशी नोंद ‘सफर’ या संकेतस्थळावर आहे. 

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-01-2023 at 01:22 IST

संबंधित बातम्या