मुंबईत लवकरच कंडक्टर नसलेल्या बसेस धावणार आहेत. कंडक्टरशिवाय बसेस धावणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल. मुंबईत लवकरच इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टमचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे स्मार्ट कार्डच्या मदतीने किंवा तिकीट वेंडिंग मशीनच्या आधारे प्रवासी तिकीट काढू शकणार आहेत. त्यामुळे बेस्ट बसेसमध्ये कंडक्टरची गरज भासणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बेस्ट प्रशासनाकडून ५० वातानुकूलित मिनी बसेस सुरु करण्यात येणार आहेत. या बसेसची क्षमता २९ प्रवाशांची (२२ आसने आणि ७ उभे प्रवासी) असेल. या मिनी बसेस भाडे तत्त्वावर घेण्यात येणार असून त्या ठराविक मार्गांवर चालवल्या जातील. या बसमध्ये चढताना प्रवाशांना दरवाज्याजवळ असणाऱ्या मशीनसमोर पास किंवा कार्ड दाखवावे लागेल. ‘जर मशीनने कार्ड स्वीकारले नाही, तर संबंधित व्यक्तीला बसमध्ये प्रवेश मिळणार नाही. या मशीनमध्ये पैसे जमा केल्यावर प्रवाशांना तिकीटदेखील मिळावे, असा आमचा प्रयत्न आहे. मात्र सध्या यावर काम सुरु आहे,’ असे बेस्टचे व्यवस्थापक जगदिश पाटील यांनी म्हटले.

नव्या बसेस सध्याच्या बसेसपेक्षा लहान असणार आहेत. इलेक्ट्रॉनिक वॉलेट्स, पास, आरएफआयडी (रेडिओ फ्रिक्वन्सी आयडेन्टिफिकेशन) कार्ड स्वीकारण्याची क्षमता या बसमध्ये लावण्यात येणाऱ्या मशीनमध्ये असेल. ‘भाडे तत्त्वावर घेण्यात आलेल्या विनावातानुकूलित आणि व्होल्वो बसेसमध्येदेखील इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टमचा वापर करण्याची योजना आहे. त्यामुळे या बसेसमध्ये तिकीट देण्यासाठी कंडक्टरची आवश्यकता भासणार नाही,’ असेदेखील जगदिश पाटील यांनी सांगितले.

बेस्ट बसेस कंडक्टरशिवाय धावल्यास प्रत्येक फेरीमागील खर्चात घट होईल. त्यामुळे त्याचा फायदा बेस्ट प्रशासनाला होणार आहे. ‘इंटेलिजंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टमच्या वापरामुळे प्रत्येक किलोमीटरसाठी येणारा खर्च ५० रुपयांवरुन ३० रुपयांवरुन येईल. बसेसचा आकार लहान असल्यामुळे त्या रस्त्यावरील कमी जागा व्यापतील. त्यामुळे वाहतूक कोडींचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल. त्यामुळे बेस्ट बस वेळेवर येण्याचे प्रमाणदेखील वाढेल,’ असे जगदिश पाटील यांनी सांगितले. या नव्या योजनेसाठी २५ कोटींचा खर्च बेस्ट प्रशासनाला अपेक्षित आहे.

एसी बसेसमुळे बेस्ट प्रशासनाच्या उत्पन्नावर मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. एसी बसेसचा देखभाल खर्च जास्त आहे. यासोबतच इंधन खर्चदेखील जास्त असल्याने आणि प्रवाशांकडून फारसा प्रतिसाद नसल्याने एसी बसेसमधीन बेस्टला फारसे उत्पन्न मिळत नाही. एसी बसेसचे तिकीट जास्त असल्याने प्रवासी या बसेसकडे पाठ फिरवत असल्याने एसी बसेस बेस्टसाठी पांढरा हत्ती ठरत आहेत.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coming soon on mumbai roads best buses without conductors
First published on: 28-04-2017 at 09:04 IST