प्रवासादरम्यान प्रवाशांची निष्काळजी कायम; रेल्वेकडूनही कारवाईचा वेग मंदावलेला

मुंबई: मुखपट्टी असूनही त्याचा योग्य प्रकारे वापर न करण्याचे प्रकार लोकल प्रवासादरम्यान होत आहेत. मध्य व पश्चिम रेल्वेवर गर्दीच्या स्थानकांत तर ही परिस्थिती जास्तच दिसून येते. अशा प्रवाशांविरोधात रेल्वेकडून कारवाईचा वेग मंदावला आहे. गेल्या ऑगस्टपासून सप्टेंबपर्यंत मध्य रेल्वेवर ५०० हून अधिक आणि पश्चिम रेल्वेवर पालिका व रेल्वेने केलेल्या एकत्रित कारवाईत तीन हजारांपेक्षा जास्त प्रवासी सापडले आहेत. कारवाई करूनही ‘जैसे थे’च परिस्थिती आहे.

मुखपट्टी आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक असतानाही अनेक प्रवासी मुखपट्टीशिवाय लोकल प्रवास करीत आहेत. काही जण मुखपट्टी हनुवटीवर ठेवून प्रवास करताना दिसतात, तर काही प्रवाशांची मुखपट्टी खिशात वा हातात दिसते. मध्य रेल्वेवरील ठाणे, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि पश्चिम रेल्वेवरील प्रभादेवी, मुंबई सेन्ट्रल, चर्चगेट यांसह काही गर्दीच्या स्थानकांत फेरफटका मारल्यास फलाटावर उभे असलेल्या काही प्रवाशांच्या गप्पा या मुखपट्टीशिवाय होतात. लोकल डब्यातून प्रवास करताना अनेक प्रवासीही अशाच प्रकारे वावरतात. फलाट, पादचारीपूल, लोकल गाडय़ांमध्ये प्रवासी मुखपट्टीचा वापर टाळून नियमाला तिलांजलीच देतात.

रेल्वेचे कारवाईकडे दुर्लक्ष

* मध्य रेल्वेवर एप्रिल महिन्यात मुखपट्टीशिवाय फिरणाऱ्या ४४६ प्रवाशांवर रेल्वेकडून कारवाई करण्यात आली होती.

* मे महिन्यात हीच संख्या ७७९ होती, तर जुलै व ऑगस्टमध्ये ती कारवाई अडीचशेच्या खाली आली.

* गेल्या महिन्यापासून २९ सप्टेंबपर्यंत साधारण ५०८ प्रवासी मुखपट्टीशिवाय आढळल्याचे सांगण्यात आले.

* पश्चिम रेल्वे व पालिकेच्या मदतीने एप्रिलमध्ये २ हजार ६४६ प्रवाशांवर कारवाई केली.

* ऑगस्ट महिन्यात हीच संख्या १८१६ होती, तर सप्टेंबर महिन्यात १५०० असल्याचे सांगण्यात आले.

कारवाईचे प्रमाण कमी

मुखपट्टी न घालणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करण्यासाठी मुंबई पालिकेने रेल्वेच्या मदतीसाठी स्थानकात काही महिन्यांपूर्वी मार्शल नियुक्त केले. या कारवाईची तीव्रता वाढविण्यासाठी मार्शलची संख्या वाढविण्यातही आली. काही प्रमाणात पालिकेकडूनही कारवाई सुरूच ठेवली. परंतु त्याचे प्रमाण कमी झाले.