दूधाच्या पॅकेजिंगसाठी प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातलेली नाही. त्यामुळे पिशव्यांचा तुटवडा असल्याची वितरकांची तक्रार खोटी असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पॅकेजिंग पिशव्यांच्या तुटवड्याची सबब सांगून वितरकांनी दूधदरवाढीच्या धमक्या देऊ नयेत याला आम्ही घाबरत नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कदम म्हणाले, संपूर्ण महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी यशस्वी होत आहे. दुधाच्या पिशव्या मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतात मात्र, त्या तेवढया प्रमाणात पुनर्प्रक्रियेसाठी जात नाहीत. त्यामुळे त्यांना पिशव्या उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. याच्या अंमलबजावणीची जबाबदारी दूध वितरक आणि प्लास्टिक उत्पादक यांनी घ्यावी, त्याला आपली हरकत नाही, असे कदम यांनी म्हटले आहे.

दरम्यान, दूध ग्राहकांकडून डिपॉझिटची रक्कम घेऊन पिशवी परत केल्यावर ती रक्कम दूध विक्रेत्यांनी परत करावी, ही योजना प्लास्टिक बंदी लागू झाल्यापासून गेल्या सहा महिन्यांपासून सुरु आहे. मात्र, यातही अडचणी येत असतील तर याबाबत लवकरच मंत्रालयात एक बैठक बोलविण्यात येईल आणि यावर तोडग्यासाठी प्रयत्न केले जातील असे कदम यांनी स्पष्ट केले.

प्लास्टिक बंदी मागे घेणार नसल्यावर पर्यावरण मंत्री रामदास कदम ठाम आहेत. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत असलेल्या दूध वितरकांनी प्लास्टिक बंदीबाबत सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास दूध उत्पादक आंदोलन करतील असा इशारा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा दूध उत्पादक आणि सरकार यांच्यात संघर्षाची चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaint of distributors of plastic bags is wrong says ramdas kadam
First published on: 07-12-2018 at 16:32 IST