मुंबई : करोनाच्या ओमायक्रॉन विषाणूच्या धोक्याबाबत चिंता व्यक्त करत सोमवारी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत या विषाणूचा संसर्ग रोखण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांबाबत सतर्क राहण्याच्या व त्यांच्यावर प्रशासन लक्ष ठेवत असल्याबाबत काळजी घेण्याची गरज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. तर १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून एक हजाराच्या आसपास प्रवासी मुंबईत आले असून त्यांच्याशी संपर्क साधला जात असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील पोलीस व प्रशासकीय अधिकाऱ्यांसह झालेल्या करोनाबाबतच्या बैठकीची माहिती मंत्रिमंडळ बैठकीत दिली. ज्या देशांमध्ये पुन्हा एकदा करोनाचा उद्रेक झाला आहे तेथील लाट मोठी असून फ्रान्स, जर्मनी, नेदरलँड, ऑस्ट्रिया या देशांमध्ये दररोज ३० हजारांपेक्षा जास्त लोकांना करोनाची लागण होत असल्याचे आढळले आहे. ओमायक्रॉन विषाणूचे ५० पेक्षा अधिक जास्त उत्परिवर्तन आहेत. सध्याच्या आरटीपीसीआर चाचणीत या प्रकाराची लागण असल्यास एस जिन आढळणार नाही. सध्या तरी प्रतिबंधासाठी मुखपट्टी सर्वात जास्त आवश्यक आहे. केंद्र सरकारने १२ देशांतल्या प्रवाशांची तेथून विमानात बसण्यापूर्वी ७२ तास अगोदर आरटीपीसीआर चाचणी आवश्यक केली असून उतरल्यावर परत एकदा आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. तसेच ७ दिवसांसाठी विलगीकरण आवश्यक आहे, असे मुख्यमंत्र्यांनी बैठकीत सांगितले. 

 १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून एक हजाराच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. आतापर्यंत जे लोक आले त्यांची माहिती राज्य सरकारने मिळवली आहे. जे मुंबईत आहेत त्यांना महापालिकेकडून संपर्क साधला जात आहे.

याशिवाय परदेशातून गेल्या १० दिवसांत परत आलेल्या सर्वाशी संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेतली जात असल्याचे आदित्य ठाकरे यांनी नंतर सांगितले. तसेच परदेशातून येणाऱ्या प्रवासी-रुग्णांसाठी संस्थात्मक विलगीकरणाची व्यवस्था केली जात असल्याचेही ठाकरे म्हणाले.

पंतप्रधानांकडे मागणी

परदेशातून येणारे प्रवासी थेट मुंबईत किंवा महाराष्ट्रातील इतर विमानतळांवर न उतरता देशात इतरत्र उतरून नंतर देशांतर्गत विमान सेवेने किंवा रस्ते आणि रेल्वेमार्गे आल्यास त्यांची तपासणी कशी करणार हा सध्याचा प्रश्न असून पंतप्रधानांनादेखील यासंदर्भात माहिती द्यावी यावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. तसेच देशभरातील आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत विमानसेवांनी प्रवाशांची माहिती नियमितपणे एकमेकांना दिल्यास रुग्ण प्रवासी तसेच त्यांच्या संपर्कातील प्रवासी शोधणे सोपे जाईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concerns about covid new variant thousands of travelers from south africa reached in mumbai zws
First published on: 30-11-2021 at 02:25 IST