राज्य सरकारविरोधात शिवसेनेने दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव विरोधी पक्षांच्याच अविश्वासामुळे बुधवारी बासनात गेला. नियमानुसार हा प्रस्ताव सदनाच्या निदर्शनास आणण्यात आला, मात्र त्या वेळी विरोधी पक्षाच्या २९ सदस्यांनी या ठरावास अनुमोदन न दिल्याने तो व्यपगत (लॅप्स) झाल्याने हे प्रकरण निकाली निघाल्याची घोषणा विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केली.
राज्यातील सिंचन घोटाळा, महागाई, भ्रष्टाचार आदी मुद्दय़ांवरून शिवसेनेने २७ नोव्हेंबरला राज्य सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव अध्यक्षांकडे दाखल केला होता. मात्र अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच मनसेने या प्रस्तावास विरोध केला. तर संख्याबळाचा विचार करता भाजपनेही या प्रस्तावाबाबत आपली भूमिका शेवटपर्यंत गुलदस्त्यातच ठेवली होती.