मुंबई : ‘‘जलसंपदा विभागाला अर्थसंकल्पात निधी मंजूर के ल्यानंतर त्या कामांची फाइल पुन्हा वित्त विभागाकडे कशासाठी जाते? असेच चालणार असेल तर जलसंपदा विभागच बंद करून टाका!’’ जलसंपदामंत्री जयंत पाटील तावातावाने मंत्रिमंडळ बैठकीत बोलत होते आणि १५-१६ वर्षांपूर्वीचा मंत्रिमंडळातील असाच प्रसंग उपस्थित ज्येष्ठ मंत्र्यांच्या डोळ्यांसमोर तरळून गेला. फरक इतकाच की त्यावेळी जलसंपदामंत्री अजित पवार बोलत होते आणि जयंत पाटील वित्तमंत्री होते आणि आता नेमके  उलटे! इतिहासाची पुनरावृत्ती होत असते ती अशी.

जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अप्पर मुख्य सचिव विजय गौतम यांची पुन्हा विभागात वर्णी लावण्यावरून जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि मुख्य सचिव सीताराम कुं टे यांच्यात शीतयुद्ध सुरू झाले आहे. जयंत पाटील मंत्रिमंडळ बैठकीत कुंटे यांना लक्ष्य करत आहेत. बुधवारी जलसंपदा विभागाच्या कामांची फाइल वित्त विभागाकडे पाठवण्यावरून जयंत पाटील यांनी कुंटे यांना धारेवर धरले. असेच काम चालणार असेल तर जलसंपदा विभागच  बंद करा, असे उद्विग्न उद्गारही त्यांनी काढले.

राजकारणात दिसते तसे नसते म्हणून जग फसते ही उक्ती बरेचदा लागू होते. या प्रकरणातही वरकरणी हा सीताराम कुं टे आणि जयंत पाटील यांच्यातील वाद दिसत असला तरी तो खरा अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यातील संघर्ष. त्याचे मूळ आहे २००४ नंतरच्या काळात अजित पवार जलसंपदामंत्री झाले तेव्हाच्या काळात. जयंत पाटील हे त्यावेळी वित्तमंत्री होते. जलसंपदा विभागाच्या कामांच्या फायली वित्त विभागात अडकू न पडत होत्या. जयंत पाटील यांनी होकार दिल्यानंतरच त्या फायली सुसाट गतीने मंजूर व्हायच्या. त्यामुळे अजित पवार इतके  वैतागले होते.

अशाच एका मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार यांनी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यासमोर विषय काढला. अर्थसंकल्पात एकदा जलसंपदा विभागाला निधी दिला की त्यातून करायच्या कामांची फाइल वित्त विभागाकडे कशासाठी जायला हवी, असा त्यांचा मुद्दा. खूप तावातावाने अजित पवार बोलले. राष्ट्रवादीतीलच दोन मंत्र्यांमधील हा संघर्ष पक्षातील मंत्री अवाक होऊन तर काँग्रेसचे मंत्री मनातल्या मनात खूश होत पाहत होते. जलसंपदा विभागाला अर्थसंकल्पात निधी दिला असला तरी तो हवा तसा खर्च करण्याचा अधिकार त्या विभागाला नाही. पाच कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या कामांची फाइल पुन्हा वित्त विभागाकडे जाणेच योग्य आहे, असा निर्णायक कौल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी दिला. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीतून बाहेर पडताना चिडलेले अजित पवार अनेकांनी पाहिले.

आता दीड दशकानंतर त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. तेव्हा वित्तमंत्री जयंत पाटील यांच्या विभागाकडे फाइल अडकू न पडत होती आणि अजित पवार वैतागले होते. आता वित्तमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे आले आहे आणि जयंत पाटील यांच्या जलसंपदा विभागाच्या फायली पवारांकडे जात असल्याने वैतागले आहेत. एका हिंदी चित्रपटात संवाद आहे, ‘‘मौका सभी को मिलता है’’…अजित पवार यांना तो दीड दशकानंतर मिळाला व या दोन मंत्र्यांच्या कथानकाला तो संवाद चपखल लागू पडत आहे.

विलासरावांसारखा खमकेपणा मुख्यमंत्री दाखवणार का?

दीड दशकापूर्वी जलसंपदामंत्री अजित पवार-वित्तमंत्री जयंत पाटील यांच्या विभागांच्या अधिकारांच्या वादात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या कामाच्या फायली या वित्त विभागाकडे मंजुरीसाठी पाठवाव्याच लागतील, असा निर्णायक कौल देत खमके पणा दाखवला होता. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तोच खमके पणा दाखवतात का? याची उत्सुकता आहे.