राफेल घोटाळा हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असून त्यासंदर्भात आता संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या घोटाळ्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्र्यांनी देशाची दिशाभूल केली आहे. सर्जिकल स्ट्राइक दिवस साजरा करून सैनिकांच्या शौर्याचं राजकारण केलं जातं आहे असाही आरोप चव्हाण यांनी केला.

मोदी सरकारविरोधात समविचारी पक्षांची आघाडी करण्यासाठी २४ तारखेला बैठक होणार असल्याचेही अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. इंधनाचे दर कमी करण्यासाठीही केंद्र सरकारकडून काहीही प्रयत्न होताना दिसत नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. वादग्रस्त राफेल कराराबाबत फ्रान्सचे माजी अध्यक्ष ओलांद यांनी भागीदार म्हणून भारतीय कंपनी निवडण्याचं स्वातंत्र्य आम्हाला नव्हतं असं म्हटलं आहे. भारतानेच आम्हाला भागीदार कंपनीची शिफारस केली होती आणि ते ऐकावं लागलं असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळेच संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आधी केलेल्या दाव्यांवर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी आता राजीनामा द्यावा अशीही मागणी अशोक चव्हाण यांनी केली.

ओलांद यांनी काय म्हटले आहे?
राफेल व्यवहारासाठी भारत सरकारनेच रिलायन्सच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्यामुळे राफेल लढाऊ विमाने बनवणारी कंपनी डसॉल्टकडे रिलायन्सला सहकारी बनवण्याशिवाय इतर कोणताही पर्याय उरला नव्हता. भारत सरकारने आमच्याकडे अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीशी व्यवहार करण्याची शिफारस केली होती. त्यामुळे आमच्याकडे कुठलाही पर्याय शिल्लक नव्हता.