काँग्रेसचा सरकारला सवाल
राज्य सरकारने विविध सवलतींचा वर्षांव केलेल्या ‘कोल्ड प्ले’ कार्यक्रमाच्या आयोजकांनी कार्यक्रमस्थळी दारू विक्रीसाठी परवानगी मागितली आहे. गरिबी निर्मूलन आणि युवकांना सामाजिक जाणीव करून देण्याचा उद्देश असल्याचे सांगण्यात येत असताना सरकार मद्यविक्रीस परवानगी देणार का, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या वेळी मैदानाचे भाडे आकारणाऱ्या सरकारने ‘कोल्ड प्ले’ कार्यक्रमाला मैदान वापराकरिता सवलत दिली आहे. याशिवाय महाराष्ट्र सरकार या कार्यक्रमाचे सहआयोजक आहे. या कार्यक्रमाकरिता करमणूक कर माफ करण्यात आला आहे. आता कार्यक्रमाच्या संयोजकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी मद्यविक्रीकरिता सरकारकडे परवानगी मागितली आहे. भाजप सरकार मद्यविक्रीस परवानगी देणार का, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला. मद्यविक्रीस परवानगी दिल्यास युवकांना कोणती प्रेरणा मिळेल, असा सवालही केला आहे. हा वाद्यवृंद आहे की, मद्यपानाचा कार्यक्रम याचे सरकारने उत्तर द्यावे, अशी मागणीही सावंत यांनी केली आहे. काँग्रेसचा या कार्यक्रमाला विरोध नाही, असे स्पष्ट करीत सावंत यांनी, नियमांचे पालन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.