विधान परिषदेच्या निवडणुकीत दगाफटका होऊ नये म्हणून काँग्रेसने आपल्या नगरसेवकांना बुधवारीच अज्ञातस्थळी हलविले. काँग्रेसचे नगरसेवक सध्या दमण येथे असल्याचे समजते. तर राष्ट्रवादी काँग्रेसने व्हिप जारी करून काँग्रेस उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश आपल्या नगरसेवकांना दिले. मनसेही तटस्थ राहण्याच्या भूमिकेवर कायम आहे.
मुंबई महापालिकेतून दोन सदस्य विधान परिषदेवर जाणार असून त्यासाठी २७ जानेवारीला मतदान होत आहे. मत फुटू नयेत यासाठी सर्वच राजकीय पक्ष काळजी घेऊ लागले असून काँग्रेसने बुधवारीच आपल्या सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी रवाना केले. काँग्रेस नगरसेवक दमण येथील हॉटेल डेल्टिंगमध्ये असल्याचे समजते. काँग्रेस नेते गुरुदास कामत, मुंबई काँग्रेस कमिटी अध्यक्ष संजय निरुपम आणि विधान परिषदेच्या रिंगणातील उमेदवार भाई जगताप यांनी गुरुवारी दमण येथे जाऊन नगरसेवकांशी चर्चा केली. काँग्रेस नगरसेवकांना २५ डिसेंबर रोजी मुंबईमधील हॉटेल आयटीसी मराठामध्ये हलविण्यात येणार असल्याचे समजते. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने गुरुवारी व्हिप जारी केला. काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आदेश राष्ट्रवादीने आपल्या नगरसेवकांना दिले आहेत. या निवडणुकीत तटस्थ राहण्याची भूमिका मनसेने घेतली आहे.