रिलायन्सच्या ‘फोर-जी’साठी रस्त्यावर बारीक चर खोदून केबल टाकण्यात येत असून त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा होऊ लागली आहे. या कामाचा थेट मुंबईकरांना फटका बसत असून अनेक ठिकाणी पादचाऱ्यांचे छोटे-मोठे अपघात होत आहेत. त्यामुळे तत्काळ ही केबल टाकण्याचे काम थांबवावे आणि मुंबईकरांना त्रास देणाऱ्या रिलायन्स कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
पालिकेने दूरसंचार कंपन्यांना रस्त्याखालून केबल टाकण्यासाठी आणि मोकळ्या जागेवर बेस स्टेशन व कक्ष उभारण्यास परवानगी दिली आहे. रिलायन्स जी. ओ. इन्फोकॉम कंपनीला ११६० मोकळ्या जागांवर बेस स्टेशन उभारण्यासाठी पालिकेने परवानगी दिली आहे. ही केबल मायक्रो टनेलिंग पद्धतीने टाकावी, अशी अट पालिकेने घातली आहे. मात्र रिलायन्स जी. ओ. इन्फोकॉम कंपनीने या अटीला हरताळ फासून रस्ते, पदपथावर लहान चर खोदून केबल टाकण्याचे काम सुरू केले आहे. हे चर वेळीच भरण्यात येत नसल्यामुळे काही ठिकाणी मोठे खड्डे पडू लागले आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांचे हाल होत असून वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे हे काम तत्काळ थांबवावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी केली आहे. परळ, शिवडी, वांद्रे, खार, सांताक्रूझ, अंधेरी, कांदिवली, बोरिवली, मानखुर्द, देवनार आदी विभागांमध्ये अशा पद्धतीने हजारो मीटर लांबीचे चर खोदून केबल टाकण्याचे काम सुरू असून रस्त्यांची दुर्दशा झाली आहे, असे देवेंद्र आंबेरकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
काही ठिकाणी परवानगी न घेताच केबल टाकण्याचे काम हाती घेतल्यामुळे वाहतूक पोलिसांनी हरकत घेतली असून, तेथील कामे अर्थवट स्थितीत आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Dec 2015 रोजी प्रकाशित
रस्त्यांची दुर्दशा करणाऱ्या रिलायन्स कंपनीवर कारवाईची मागणी
मुंबईकरांना त्रास देणाऱ्या रिलायन्स कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 23-12-2015 at 00:11 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress demand action against reliance for damaging road