कायदा व सुव्यवस्था राखण्यात फडणवीस अपयशी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांची टीका

मुंबई : पुणे एसटी बलात्कार प्रकरणाने उभ्या महाराष्ट्रात खळबळ उडवून दिलेली असतानाच केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीच्या छेड काढल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या दोन्ही प्रकरणानंतर प्रदेश काँग्रेसने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले आहे. हा सर्व प्रकार महाराष्ट्रात ‘जंगलराज’ असल्याचे निदर्शक असून कायदा सुव्यवस्था राखण्यात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

गुंडांना राजाश्रय असल्याने राज्यात महिला मुलींवरील अत्याचारांमध्ये प्रचंड वाढ होत आहे. केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाहीत तिथे सर्वसामान्यांच्या लेकींची काय अवस्था असेल याचा विचार न केलेला बरा. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर वचक नाही. सुरक्षारक्षक सोबत असतानाही मंत्र्यांच्या मुलींची छेड काढली जाते हे कायदा सुव्यस्थेचे धिंडवडे निघाल्याचे निदर्शक आहे. टवाळखोरांना अटक करावी या मागणीसाठी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांना पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या द्यावा लागतो यावरून राज्यात पोलिसांचे नाही तर गुंडांचे राज्य आल्याचे स्पष्ट दिसत असल्याची टीका सपकाळ यांनी केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करा

महायुती सरकारने निवृत्त झालेल्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ दिली आहे. पण शुक्ला यांची पोलीस प्रशासनावर वचक राहिला नाही, त्यामुळे गुन्हेगारांचे मनोबल वाढले आहे. राज्याला सक्षम पोलीस महासंचालक आणि पूर्ण वेळ गृहमंत्र्यांची आवश्यकता आहे. त्याशिवाय राज्यातील गुन्हेगारी आणि महिलांवरील अत्याचार नियंत्रणात येऊ शकणार नाहीत. त्यामुळे रश्मी शुक्ला यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.