मुंबई : राज्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी व्हीव्हीपॅटची आवश्यकता आहे. मतदाराने कुणाला मत दिले हे त्यांना समजले पाहिजे. त्यामुळे राज्यात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हीव्हीपॅट यंत्राशिवाय घेऊ नये. ही यंत्रे नसतील तर निवडणुका मतपत्रिकेवर घ्याव्यात, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी येथे केली.

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट मशीन नसणार असल्याचे स्पष्ट केले होते. एका प्रभागात जास्त उमेदवार असणार असून मतदारांना एकाचवेळी चार मते द्यावी लागणार आहेत. या प्रक्रियेला वेळ लागेल आणि मतदान केंद्रावर गर्दी होण्याची शक्यता असल्याने राज्य निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट न वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी आयोगाच्या भूमिकेवर टीका केली.

राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका: हर्षवर्धन सपकाळ

दरम्यान, राज्यात लवकरच महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकीत शहरी भागात प्रभाग रचना आणि ग्रामीण भागात गट तसेच गण निश्चित केले जातात. प्रभाग, गट आणि गण निश्चित करताना कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ग्रामविकास तसेच नगरविकास विभागाचे मुख्य सचिव यांना पाठवलेल्या पत्रात केले आहे.

प्रभाग रचना करताना या संदर्भात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पुरेपुर पालन होणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निश्चित करताना तसेच त्यांच्या चतुःसीमा ठरवताना नियमामध्ये नमूद असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. या कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही आणि कोणत्याही राजकीय दबावाखाली चुकीचे काम होणार नाही याची दक्षता घ्यावी अन्यथा न्यायालयात दाद मागावी लागेल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही राज्य सरकारवर राहील, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.