मुंबई :  देशात सामाजिक विषमता पसरवणारेच आता विषमतेच्या विरोधात बोलू लागले आहेत, अशा शब्दात  काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपवर टीका केली. केंद्रात संघाच्या विचाराचे भाजपचे सरकार आल्यापासून देशात मोठय़ा प्रमाणावर, महागाई, गरिबी व बेरोजगारी वाढली आहे, मात्र त्याबाबत संघाने व्यक्त केलेली चिंता म्हणजे केवळ जनतेची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे, असे त्यांनी म्हटले आहे.  

या सरकारच्या काळात गरिबांची संख्या प्रचंड वाढली आहे. डॉ. मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सरकारच्या काळात विकासदर उच्चांकी होता, २४ कोटी जनतेला गरिबी रेषेतून बाहेर काढले होते, परंतु मोदी सरकारच्या काळात चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे २७ कोटी जनता पुन्हा गरिबी रेषेच्याखाली गेली आहे. काँग्रेस पक्ष तसेच राहुल गांधी सातत्याने हेच मुद्दे मांडून केंद्र सरकारला जाब विचारत असतात. भारत जोडो यात्रेतही महागाई, बेरोजगारी, सामाजिक विषमता हे मुद्दे उचलून धरले जात आहेत, त्यामुळेच संघाला त्याची दखल घ्यावी लागत आहे. परंतु राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ही केवळ पोकळ चिंता आहे.  ते जनतेची दिशाभूल करीत आहेत, अशी टीका पटोले यांनी केली.

‘भारत जोडो’ची भाजपला धास्ती –  लोंढे

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पदयात्रेला सर्व जाती-धर्माच्या लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेची दखल भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला घ्यावी लागत आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत सोमवारी लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर वायुसेनेला सुपूर्द करण्याच्या जोधपूर येथील कार्यक्रमात सर्व धर्माच्या धर्मगुरुंना निमंत्रित करण्यात आले होते. भारत जोडो यात्रेची धास्ती घेतल्यानेच भाजपला आता सर्व धर्मसमभावाची आठवण झाली आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी व्यक्त केली.