भाजपला रोखण्यासाठी आघाडी व्हावी ही शरद पवार, अशोक चव्हाणांची इच्छा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपला रोखण्यासाठी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने पुन्हा एकत्र यावे म्हणून दोन्ही काँग्रेसकडून सकारात्मक भूमिका घेतली जात असली तरी मोठा भाऊ कोण असावा हा दोन्ही पक्षांमध्ये कळीचा मुद्दा ठरू शकतो. पण, सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता दोघांनाही एक पाऊल मागे घ्यावे लागेल, अशी चिन्हे आहेत.

काँग्रेससोबत आघाडी होऊ शकते, असे संकेत राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी सोलापूरमध्ये बोलताना दिले. राष्ट्रवादीसोबत आघाडीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही सकारात्मक भूमिका घेतली आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाच्या वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने काढलेल्या संयुक्त मोर्चापासून दोन्ही जुन्या मित्रांनी एकत्र यावे, असा मतप्रवाह वाढला आहे. दोन्ही काँग्रेस एकत्र आल्यास राज्यात सत्ता परिवर्तन नक्की आहे, असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मत मांडले होते. तेव्हापासून आघाडीची आवश्यकता व्यक्त केली जात आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आले आणि जागावाटप योग्य पद्धतीने झाल्यास सत्ताधारी भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहू शकते. शिवसेना स्वतंत्रपणे लढणार हे निश्चित आहे. मतांचे विभाजन टाळण्यासाठी दोन्ही काँग्रेसने एकत्र यावे अशी दोन्ही पक्षांमधील नेत्यांची भूमिका आहे. आघाडीचा फायदा दोघांनीही व्हावा, असे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. आघाडीचा काहीही निर्णय होवो काँग्रेस पक्षाच्या वतीने काढण्यात येणारी परिवर्तन यात्रा सर्व २८८ मतदारसंघांमध्ये काढली जावी, असा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या मतदारसंघांमध्ये यात्रा काढावी का, यावर पक्षात चर्चा झाली होती.

राहुल गांधींची सहमती?

  • राज्यातील नेत्यांनी आघाडीसाठी अनुकूल भूमिका मांडल्यास काँग्रेसचे नवे अध्यक्ष राहुल गांधी हे आघाडीला हिरवा कंदिल दाखवू शकतील.
  • गेल्याच आठवडय़ात राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांकडून राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला होता.
  • निवडणुकांना अद्याप वर्षभराचा कालावधी आहे. या काळात राजकीय चित्र कसे असेल यावर पुढील निर्णय घेतले जातील.
  • आघाडीला दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची अनकुलता आहे. फक्त जागावाटप हा दोन्ही पक्षांमध्ये वादाचा मुद्दा असेल.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress ncp alliance needed to stop bjp in maharashtra sharad pawar ashok chavan
First published on: 09-01-2018 at 03:38 IST