बाहेरचा उमेदवार पाठविण्याची परंपरा कायम ; विधान परिषदेसाठी नारायण राणे यांना काँग्रेसकडून संधी
राज्यसभेसाठी माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदम्बरम, तर विधान परिषदेकरिता माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची उमेदवारी काँग्रेसने शनिवारी जाहीर केली. चिदम्बरम यांच्यामुळे बाहेरच्या राज्यातील नेत्यांना महाराष्ट्रातून दिल्लीत पाठविण्याची परंपरा काँग्रेसने कायम राखली आहे.
राज्यसभा आणि विधान परिषदेकरिता पक्षात इच्छुकांची संख्या मोठी होती. बदलती राजकीय समीकरणे आणि सुब्रमण्यम स्वामी यांच्यासारख्या आक्रमक नेत्याशी सामना करण्यासाठी काँग्रेसने चिदम्बरम यांना राज्यातून राज्यसभेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. राज्याबाहेरील नेत्याला उमेदवारी देऊ नये, अशी मागणी काही आमदारांनी गेल्याच आठवडय़ात बैठकीत केली होती. तामिळनाडूमध्ये काँग्रेसचा खासदार निवडून येणे शक्य नव्हते, तसेच जयराम रमेश आणि ऑस्कर फर्नाडिस यांना कर्नाटकातून संधी देण्यात आल्याने चिदम्बरम यांच्यासाठी फक्त महाराष्ट्राचा पर्याय होता.
काँग्रेस नेत्यांचे घोटाळे संसदेसमोर मांडण्याचा इशारा वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिला आहे. या पाश्र्वभूमीवर गांधी कुटुंबीय आणि पक्षाची बाजू मांडण्यासाठीच चिदम्बरम यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे. विजय दर्डा आणि अविनाश पांडे या दोन विद्यमान खासदारांपैकी कोणाचाच विचार झाला नाही.
महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यातील नेत्यांना लोकसभा अथवा राज्यसभेवर पाठविण्याची परंपरा काँग्रेसने कायम ठेवली आहे. आयपीएलचे प्रमुख व माजी राज्यमंत्री राजीव शुक्ला हे राज्यातून राज्यसभेवर निवडून गेले आहेत. शुक्ला यांनी खासदार निधी भाजप आमदारांच्या मतदारसंघात खर्चाकरिता दिल्याबद्दल काँग्रेसचेच आमदार वीरेंद्र जगताप यांनी पक्षाकडे तक्रार केली आहे.
माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव व गुलामनबी आझाद यांना विदर्भातून लोकसभेवर निवडून आले होते. दिल्लीतील विश्वजित सिंग यांना यापूर्वी दोनदा राज्यातून राज्यसभेवर पाठविण्यात आले होते. हे सिंग महाशय फक्त दोनदा उमेदवारी अर्ज भरण्याकरिता मुंबईत आले होते, असे पक्षातील नेत्यांकडून सांगण्यात आले.
विधान परिषदेतील मुझ्झफर हुसेन, दीप्ती चौधरी आणि विजय सावंत हे तीन जण निवृत्त होत असून, हुसेन यांनाच पुन्हा संधी द्यावी, असा पक्षात मतप्रवाह होता. अल्पसंख्याक समाजातील नेत्याकडे आमदारकी कायम ठेवावी, अशी मागणी केली जात होती. पण भाजपच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या उद्देशाने राणे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे.

बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा
काँग्रेसने एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतल्याने विधान परिषदेच्या दहा जागांसाठी होणारी निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे नाईक-निंबाळकर व धनंजय मुंडे यांच्या उमेदवारीची घोषणा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केली. संख्याबळानुसार भाजपचे पाच, शिवसेना दोन असे युतीचे सात, तर आघाडीचे तीन उमेदवार निवडून येऊ शकतात.काँग्रेसने दोन जण िरगणात उतरविले असते तर निवडणूक झाली असती, पण राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या शिष्टाईमुळे काँग्रेसने नेहमीप्रमाणे नमते घेतले.