गुजरात, मध्य प्रदेशपाठोपाठ छत्तीसगढमध्ये यश; जनतेने नाकारल्याची काँग्रेसची प्रतिक्रिया
बिहार विधानसभा निवडणुकीतील यशानंतर गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मिळालेल्या यशाने काँग्रेसच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. लोकसभेतील पराभवाने खचलेल्या काँग्रेससाठी तेवढाच दिलासा ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीत पार धुव्वा उडाल्यानंतर महाराष्ट्र, हरयाणा, झारखंड, जम्मू आणि काश्मीर तसेच दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसची पार पीछेहाट झाली होती. पक्षाच्या नेतृत्वाबद्दल शंका व्यक्त करण्यात येऊ लागली. काँग्रेसच्या अस्तित्वाबद्दल भाजपचे नेते टीकाटिप्पणी करू लागले. ‘काँग्रेसमुक्त भारत’ या भाजपच्या उद्दिष्टाच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये झालेल्या विविध निवडणुकांमध्ये काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर बऱ्यापैकी यश मिळाले आहे.
बिहारमध्ये ४१ पैकी २७ जागा जिंकल्याने काँग्रेसचा आत्मविश्वास बळावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत निवडणुकांमध्ये काँग्रेसने भाजपचा पराभव केला. २५ पैकी २० पेक्षा जास्त जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली. शहरी भागात भाजपने आपले वर्चस्व कायम राखले असले तरी ग्रामीण भागात काँग्रेसने भाजपला धक्का दिला. मध्य प्रदेशमधील रतलाम लोकसभेची पोटनिवडणूक जिंकण्याबरोबरच आठपैकी पाच नगरपालिकांच्या निवडणुका काँग्रेसने जिंकल्या. अगदी गुरुवारी भाजपची सत्ता असलेल्या छत्तीसगडमध्ये ११ पैकी आठ नगरपालिका जिंकून काँग्रेसने भाजपला आणखी एक धक्का दिला. राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर तसेच स्थानिक पातळीवरील निवडणुकांमध्ये मुद्दे वेगळे असले तरी हळूहळू जनमानसात काँग्रेसला पुन्हा पाठिंबा मिळू लागला आहे. विशेष म्हणजे भाजपची सत्ता असलेल्या गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येच स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसला यश मिळाले आहे. राजस्थानमध्ये भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी घेतली असली तरी भाजप आणि काँग्रेसची मते आणि एकूण जागांमध्ये फार काही अंतर नव्हते. लोकसभा आणि विधानसभेत काँग्रेसचा पार धुव्वा उडाला होता.
भाजपबद्दल जनतेचा भ्रमनिरास
भाजपच्या कारभाराबद्दल लोकांचा भ्रमनिरास झाला असून, जनता पुन्हा एकदा काँग्रेसवर विश्वास प्रकट करीत असल्याचे बिहार, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या निकालांवरून स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया अ. भा. काँग्रेसचे सरचिटणीस गुरुदास कामत यांनी व्यक्त केली. हाच कल पुढेही कायम राहील व पुन्हा एकदा काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.